कोल्हापुरमधील नांदणीयेथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थानातील मठात हत्ती पाळण्याची परंपरा आहे. 1992 मध्ये महादेवी हत्तीणीला नांदणी मठात आणण्यात आलं होतं. 32 वर्षं तिने नांदणीत वास्तव्य केलं. पेटाने महादेवी हत्तीणीच्या आरोग्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टापर्यंत हा लढा गेला.
अखेर सुप्रीम कोर्टाकडून तिला वनताराला पाठवण्याचा निर्णय देण्यात आला. नांदणी मठाच्या महादेवी हत्तीनीला निरोप देण्यासाठी शेकडोच्या संख्येने नागरिक जमले होते. यादरम्यान नांदणी गावची लाडकी महादेवी हत्तीण परत यावी यासाठी नांदणी येथे सर्वधर्मीय नागरिकांच्या वतीने मोर्चा आणि आंदोलन देखील करण्यात आले. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर नांदणीमधील महादेवी हत्तीणीला गुजरातमधील वनतारामध्ये पाठवल्यानंतर कोल्हापुरातील नागरिकांमध्ये संताप आहे.
याचपार्श्वभूमिवर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार एका सभेत भाषण देत असताना भरसभेत त्यांच्यासमोर एका तरुणाने माधुरी हत्तीणीला परत आणा, ती कोल्हापुरची आहे अशी नाराजी बोलून दाखवली. यावेळी हा तरुण अजित पवारांच भाषण सुरु असताना इतर लोकांप्रमाणे स्टेजखाली बसला होता. त्यावेळी अजित पवार बोलत असतानाच त्या तरुणाने माधुरी हत्तीणीबद्दलची आपली भावना व्यक्त करुन दाखवली. दरम्यान तो तरुण म्हणाला की, "दादा, माधुरी हत्तीणीला गुजरातमध्ये वनताराला नेलं आहे तिला परत आणा. लय भावना दुखावल्या आहेत लोकांच्या. ती कोल्हापुरची आहे. तिला परत आणा".
यावर प्रत्युत्तर देत अजित पवार म्हणाले की, "माधुरी कोण हत्तीच ना? हत्तीणीबद्दल सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे. आपण संविधान, कायद्याने देश चालवतो. जसा आपल्याला जगण्याचा अधिकार आहे तसा प्राणी आणि पक्ष्यांनाही आहे. त्याप्रकारे त्या हत्तीणीचं झालं, म्हणूनच ती गेली बाबा". पुढे ते म्हणाले, "याला हत्तीणीचं लयच लागलंय बघा. तुला एकदा कुठं तरी हत्तीणीवर बसवतो". यानंतर उपस्थितांमध्ये हास्यकल्लोळ निर्माण झाला ज्यामुळे सभेत उपस्थितीत सगळे हसु लागले.