पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. या महिलेच्या कुटुंबाकडे रुग्णालयाने 10 लाखांची मागणी केली होती, जी कुटुंबीय देऊ शकले नाही. यामुळे त्या महिलेने दोन जुळ्या बाळांना जन्म देऊन आपला जीव सोडला. याप्रकरणी सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. याचपार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सरकारला धारेवर धरलं आहे.
तर भाजपकडून इतरांनी काय अपेक्षा ठेवायची ?
आदित्य ठाकरे म्हणाले की, "भाजप जर त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देत नसतील तर इतरांनी काय अपेक्षा ठेवायची ? हा प्रश्न उपस्थित होत आहे. जर कोणतं रुग्णालय रुग्णाकडे 10 लाख रुपयांची मागणी करत असेल, तर सरकारने त्यांना विचारायला हवं की, तुम्ही सरकारला किती टॅक्स देता, तुमचं सरकारला काही देण लागत का? हे प्रश्न सरकारने विचारायला हेव". त्यानंतर रुग्णालयावर रोख धरत आदित्य ठाकरे म्हणाले की, "एखादी हत्या झाल्यानंतर त्या आरोपीकडून असं लिहून घेतलं जाईल का? की आता त्याच्याकडून पुन्हा कोणती हत्या किंवा कोणता गुन्हा होणार नाही", असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
त्या रुग्णालय प्रशासनाची मुजोरी सरकार उतरवणार आहे की नाही?
पुढे आदित्य ठाकरे म्हणाले की, "पुन्हा असा प्रकार होणार नाही असं जर ते रुग्णालय बोलत असेल तर म्हणजे तिथले कर्मचारी हे मान्य करतात की, त्यांच्यामुळे त्या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. त्या रुग्णालयाला मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामधून 5-5 फोन येतात तरी देखील त्यांनी मदत केली नाही. मग जर मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून रुग्णालय प्रशासनाला फोन जाऊन देखील ते दखल घेत नसतील तर त्या रुग्णालय प्रशासनाचा माज सरकार उतरवणार आहे की नाही?", असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी सरकारला केला आहे