राज्यातील ओबीसी, भटके-विमुक्त, आदिवासी आणि दलित समाजाच्या हक्कासाठी नेहमीच आक्रमक भूमिका घेणारे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. फेसबुकवरून पोस्ट करत त्यांनी पवारांच्या नेतृत्वावर आणि बहुजन समाजावरील दृष्टीकोनावर तीव्र टीका केली आहे.
निधी वाटपातील अन्यायावरून संताप
हाके यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, "गेल्या काही दिवसांपासून आम्ही ओबीसी, भटक्या विमुक्त, दलित, आदिवासी समाजाच्या हक्कासाठी निधी वाटपाचा पाठपुरावा करत आहोत. मात्र सत्ताधाऱ्यांकडून उपेक्षित घटकांना दुय्यम वागणूक दिली जाते, आणि ती अस्वस्थ करणारी आहे."
अजित पवारांवर वैयक्तिक टीका
हाके यांनी अजित पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना लिहिले, "काल अजित पवार राजकीय विकृतीवर बोलले, पण ही गोष्ट हास्यास्पद आहे. धरणात पाणी नसतानाही शेतकऱ्यांना 'अमृत' पाजण्याची भाषा करणाऱ्यांनी आम्हाला विवेक शिकवू नये."
ते पुढे म्हणतात, "अजित पवारांनी महात्मा फुलेंचं मृत्यूपत्र एकदा तरी वाचावं. फुले म्हणाले होते, माझा वारस अक्षम ठरल्यास त्याला संपत्तीतून बेदखल करा. पण पवार घराणं उलट अर्थाने हा नियम पाळतंय – बहुजनहिताला जितका सुरुंग लावेल, तोच मोठा वारस!"
"दहशतीचं राजकारण करणाऱ्या नेत्यांकडून परिवर्तन अशक्य" हाके यांनी अजित पवारांवर आरोप केला की, "बहुजन नेत्यांचे 'करेक्ट' कार्यक्रम करत, त्यांचं राजकीय अस्तित्व संपवण्याचा जो प्रयत्न अजित पवार करत आहेत, त्यामुळे लोकांच्या मनात त्यांच्या विषयी फक्त 'दहशत' उरते, विश्वास नव्हे."
धनगर आणि ओबीसी समाजाच्या बाजूने ठाम भूमिका मांडत असताना हाके म्हणतात,
"मी ओबीसी आहे, भटका आहे, धनगर आहे. आमच्या रक्तातच उपेक्षितांसाठी लढण्याची तयारी असते. चार मेंढरांसाठी वाघावर धावून जाणारं आमचं बळ आहे. या लढ्यात आम्ही शेकडो वेळा बलिदान द्यायला तयार आहोत. "भटक्या, विमुक्त, मायक्रो ओबीसी घटकांना आधार द्यायचा आहे. त्यांच्यासाठी ही लढाई आहे. मी एकटा नाही. आता तुम्ही ठरवा. परिवर्तनाच्या या लढ्यात तुम्ही साथ देणार का?" राजकीय वर्तुळात या पोस्टची तीव्र चर्चा सुरु आहे. हाके यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे राज्यातील बहुजन आणि ओबीसी राजकारणाला नवे वळण मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.