Ajit Pawar
Ajit Pawar 
ताज्या बातम्या

मतदारांना नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व पाहिजे की राहुल गांधींचं? उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, "आता मतदारांनी..."

Published by : Naresh Shende

Ajit Pawar Press Conference : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. महायुती विरुद्ध इंडिया आघाडी असं चित्र देशात निर्माण झालं आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. मतदारांना नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व पाहिजे की राहुल गांधींचं? अशाप्रकारची ही निवडणूक आहे. आता मतदारांनी त्यांचा निर्णय द्यायचा आहे. अर्थात तो त्यांचा अधिकार आहे. विनंती करणं, मतदारांना जाऊन भेटणं, हे आमचं काम आहे. परंतु, अंतिम निर्णय तेच घेतील, असं पवार म्हणाले.

पत्रकार परिषदेत पवार पुढे म्हणाले, उद्या महायुतीच्या उमेदवाराचा एकच फॉर्म भरणार आहोत. देवेंद्र फडणवीस, प्रफुल्ल पटेल आणि इतर मित्रपक्षाचे काही सहकारी अर्ज भरण्यासाठी असणार आहेत. त्यानंतर सातारा आणि सांगलीचा महायुतीच्या उमेदवाराचा अर्ज भरणार आहोत. या निवडणुकीसाठी पंतप्रधान मोदी, अमित शहा यांचे दौरे सुरु आहेत. तसच प्रफुल्ल पटेल यांच्याही सभा सुरु आहेत. विरोधकांकडे कोणताही मुद्दा राहिला नाही. गेल्या दहा वर्षांच्या कारकिर्दीत मोदींनी विकास केला आहे. त्यावर विरोधक बोलू शकत नाही. आमच्या जास्त जागा निवडून आल्या तर संविधान बदलतील, जास्त जागा निवडून आल्या तर ही शेवटचीच निवडणूक होईल, तसंच महायुती आल्यावर अल्पसंख्यांक लोकांवर अन्याय होईल, असा खोटा प्रचार विरोधकांकडून सुरु आहे.

महाराष्ट्राच्या विकासाठी मोदींच्या नेतृत्वात भरीव निधी आणण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे. केंद्र शासनाच्या अखत्यारित असणारे प्रश्न पाठपुरावा करून मार्गी लावणं, अशी आमच्या निवडणूक प्रचाराची व्यूहरचना आहे. मागील काळात आम्ही एकमेकांच्या विरोधात होतो. आता हे गावकीचं, भावकीचं भांडण नाहीय. देशाला भवितव्य ठरवणारी दिशा दाखवणारी ही निवणडूक आहे. प्रत्येक पक्ष, युती किंवा आघाडी जिंकण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरतात. मनसेत कार्यकर्त्यांच्या होणाऱ्या प्रवेशाबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, राज ठाकरेंनी निर्माण केलेला हा पक्ष आहे. त्यांच्याकडे बघून कार्यकर्ते पक्षात गेले आहेत. त्यांचा आदर ठेवणारा एक वर्ग आहे.

अजित पवार राज्याचे नेते होते, पण ते आता बारामती सोडून कुठे सभा घेताना दिसत नाही, असं रोहित पवार म्हणाले होते, यावर बोलताना अजित पवार म्हणाले, मी कुठे जावं, हा माझा अधिकार आहे. त्यांच्या प्रश्नाला उत्तर देणं मला फार महत्त्वाचं वाटत नाही. लोकशाहीत कुणी कुणाला भेटावं आणि कुठे सभा घ्याव्यात, याची प्रत्येकाला मुभा आहे. ही मुभा घटनेनं दिली आहे. महायुती ४८ पैकी किती जागा जिंकणार? या प्रश्नाचं उत्तर देताना अजित पवार म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझी भेट होणार आहे. विदर्भातील पहिल्या टप्प्यातील महायुतीच्या सर्व जागा निवडून येतील, असं ऐकायला मिळत आहे. अर्ज भरल्यावर जास्त अंदाज येईल. मतदारांची गोळाबेरीज कशी करता येईल, त्यांना आपल्याकडे आकर्षित करता येईल, यासाठी सर्व पक्षांकडून प्रयत्न सुरु आहे, असंही पवार म्हणाले.

Hair Growth: केस गळतीमुळे त्रस्त आहात? एकदा नक्की वापरून पाहा 'हे' जादुई तेल...

पंतप्रधान मोदी यांच्या सभेत झालेल्या गोंधळावर जयंत पाटील यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Mahayuti Sabha: आज महायुतीची जाहीरसभा! पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकाच मंचावर

Sanjay Raut : फक्त आमची सभा होऊ नये म्हणून प्रधानमंत्र्यांना बोलवण्यात आलं

Sanjay Raut : प्रधानमंत्री मुंबईत येऊन 25 - 30 सभा घेतात, मग तुम्ही 10 वर्ष काहीच काम केलं नाही ना