आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेला आजपासून सुरुवात होणार आहे. दरवर्षी लाखो भाविक या यात्रेसाठी उपस्थितीत राहतात. राज्यभरातून हजारो भाविक आंगणेवाडीत दाखल होत असतात.
नेते मंडळीही या यात्रेला हजेरी लावत असतात. भराडी देवीच्या मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील मसुरे एक गाव आहे. या गावात आंगणेवाडी नावाची वाडी असून या वाडीत 'भराडी देवी'चे मंदिर आहे. आंगणेवाडीच्या जत्रेची तारीख कोणत्याही तिथीवर ठरत नसून देवीचा कौल घेऊनच यात्रेचा दिवस ठरविण्यात येतो.
लाखो भाविकांच्या स्वागतासाठी आंगणेवाडीनगरी सजली असून ग्रामस्थ, मंडळे आणि प्रशासनाने चोख नियोजन केले आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर महिनाभर आंगणे कुटुंबीय तयारीच्या कामात व्यस्त असतात. भराडी देवीच्या यात्रेला मुंबईतून मोठ्या संख्येने चाकरमानी दाखल होत असतात.