(Sambhajinagar Accident ) छत्रपती संभाजीनगर-जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील फुलंब्री तालुक्यात मंगळवारी रात्री साडेअकरा वाजता भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असलेली कार दुभाजकाला धडकून उलटल्याने तिघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे.
जखमींवर छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे 5 जण फुलंब्रीहून छत्रपती संभाजीनगरकडे येत असताना कार बिल्डा गावाजवळील पुलावरील दुभाजकाला धडकली. धडकेनंतर कार पलटी झाली आणि कारमधील तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच फुलंब्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सहाणे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने जखमींना तातडीने रुग्णालयात हलवले असून अपघाताचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही. पोलीस अधिक तपास करत आहेत.