Amit Shah Pune : "बाजीराव पेशवेंनी 40 वर्षाच्या आयुष्यात..." पुण्यात शाहांकडून पेशवांच्या शौर्यावर भाष्य
पुण्याच्या ऐतिहासिक वारशाला अभिवादन करत आज नॅशनल डिफेन्स अॅकॅडमी (एनडीए) परिसरात श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या स्मारकाचे उद्घाटन देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी त्यांनी बाजीराव पेशवे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा उल्लेख करत वर्तमान पिढीला प्रेरणादायी संदेश दिला. पुण्यात आयोजित कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या शौर्याचे आणि ऐतिहासिक योगदानाचे विशेष गौरवाने स्मरण केले.
त्यांनी सांगितले की, "माझ्या जीवनात जेव्हा नैराश्य येते, तेव्हा मी छत्रपती शिवाजी महाराज आणि श्रीमंत बाजीराव पेशवे यांचे विचार मला प्रेरणा देतात. एवढ्या कठीण काळात त्यांनी जे काही साध्य केलं, ते अकल्पनीय होतं." शाह यांनी स्पष्ट केलं की, दक्षिण भारत मुघलांच्या आक्रमणांनी त्रस्त होता, तर उत्तर भारत थेट मुघलांच्या अधीन होता. अशा वेळी केवळ 12 वर्षांच्या शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची कल्पना रुजवली. ही चळवळ पुढे संभाजी महाराज, ताराबाई, धनाजी-संताजींसह अनेकांनी चालवली. शाहू महाराजांच्या सुटकेनंतर मराठा साम्राज्य दोन भागांत विभागलं गेलं
अशा वेळी बालाजी विश्वनाथ आणि नंतर बाजीराव पेशव्यांनी शिवाजी महाराजांच्या कार्याला नवी दिशा दिली. श्रीमंत बाजीराव पेशवे हे एक असामान्य सेनापती होते. त्यांनी 41 युद्धांत विजय मिळवला, त्यातील पालखेडच्या युद्धातील यश अकल्पनीय मानलं जातं. त्यांची रणनीती, जलद गती आणि दूरदृष्टी यामुळे मराठा साम्राज्य तंजावूरपासून कटकपर्यंत विस्तारलं. त्यांनी केवळ युद्धात नव्हे, तर प्रशासन, सुधारणांमध्येही उत्कृष्ट काम केलं. प्रत्येक शिपायासाठी तीन घोड्यांची व्यवस्था करणं ही त्यांची रणनीतीची झलक होती.
बाजीराव पेशवे स्वतःसाठी कधीच लढले नाहीत, ते सदैव स्वराज्यासाठी समर्पित राहिले. 40 वर्षाच्या आयुष्यात त्यांनी अमर इतिहास घडवला, जो अनेक शतकांनीही तोडता येणार नाही. काहीजण त्यांना ‘शिवष्योत्तम सेनापती’ म्हणतात. शाह यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’चा उल्लेख करत सांगितले की, भारताच्या स्वाभिमानी इतिहासातून प्रेरणा घेऊन, आजचा तरुण "विकास आणि विरासत" या तत्त्वांवर पुढे जावा. बाजीरावांचे चरित्र सर्व भारतीय भाषांमध्ये पोहोचवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आणि तरुण पिढीसाठी ते महान प्रेरणास्थान असल्याचे सांगितले.