चीन सरकारने देशातील घटती लोकसंख्या रोखण्यासाठी महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. नवीन योजनेअंतर्गत वडील होणाऱ्या पुरुषांना ₹1.3 लाख (सुमारे $1500) सबसिडी देण्यात येणार असून, त्यांना 30 दिवसांची सवेतन रजा (paid leave) देखील मिळणार आहे.
ही रक्कम मुल जन्मल्यावरच दिली जाईल. यामध्ये $500 बाळासाठी आणि $1000 पालकांसाठी देण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे ही योजना तीन वर्षांखालील मुलांनाही लागू होईल. कुठलाही पात्र चिनी नागरिक या योजनेसाठी अर्ज करू शकतो आणि सबसिडी थेट बँक खात्यात जमा केली जाईल.
फुडान विद्यापीठ आणि हाँगकाँग विद्यापीठाच्या संशोधनानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या अभ्यासात सुचवले गेले होते की, वडिलांना थेट आर्थिक मदत दिल्यास जन्मदरात वाढ होण्याची शक्यता आहे.
सध्या चीनचा प्रजनन दर केवळ 1.09 असून, सरकारला तो 3 पर्यंत नेण्याचा प्रयत्न आहे. विविध प्रांतांनी स्वतंत्र पातळीवर सुट्टीसंबंधी निर्णय घेतले आहेत. उदाहरणार्थ, सिचुआनमध्ये वडिलांना 25 दिवस, शेडोंगमध्ये 18 दिवस आणि शांक्सी-गांसूमध्ये 30 दिवसांची पितृसुट्टी दिली जाते. पूर्वी ही सुट्टी फक्त 3 दिवसांची होती. या प्रादेशिक योजनांचे यश पाहून केंद्र सरकारनेही भविष्यात देशभर लागू करण्याचा विचार केला आहे.