रक्षाबंधनाच्या पवित्र दिनानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधत शरद पवारांवर जोरदार टीका केली. रक्षाबंधन हे केवळ बहिण-भावाच्या नात्याचे प्रतीक नसून भारतमातेच्या रक्षणाचाही संकल्प करण्याचा दिवस आहे, असे सांगत त्यांनी सर्व लाडक्या बहिणींना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर त्यांनी शरद पवारांच्या अलीकडील विधानांवर प्रतिक्रिया व्यक्त केली.
शरद पवारांनी अलीकडेच दावा केला की विधानसभा निवडणुकीच्या काळात काही व्यक्तींनी त्यांना भेटून “१६० जागांमध्ये फेरफार करून निवडून आणू” अशी ऑफर दिली होती. यावर फडणवीसांनी प्रश्न उपस्थित केला की, “पहिल्यांदा मला हे लक्षात येत नाहीये की इतक्या दिवसानंतर पवार साहेबांना राहुल गांधींना भेटल्यावरच हेची आठवण का आली? इतके दिवस ते बोलले नाहीत आणि आज अचानक बोलले.”
फडणवीस म्हणाले, “राहुल गांधी ज्याप्रमाणे सलीम-जावेदच्या कहाण्या तयार करून त्यांच्या स्क्रिप्टवर रोज नवीन कपोलकल्पित कहाण्या सांगतात, तशी अवस्था पवार साहेबांची तर झाली नाही ना? कारण पवार साहेब अनेक वर्ष राहुल गांधी जरी ईव्हीएमबद्दल बोलत होते, तरी देखील कधी बोलत नव्हते. किंबहुना पवार साहेबांनी स्पष्टपणे अनेक वेळा भूमिका घेतली की ईव्हीएमला दोष देणं हे अयोग्य आहे. आता अचानक मला असं वाटतं की अशा प्रकारे जे काही पवार साहेब बोलले आहेत, ते राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम दिसतोय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून एक प्रकारचा संभ्रम निर्माण केला जातोय.”
ते पुढे म्हणाले, “कितीही संभ्रम निर्माण झाला तरीही भारतात एवढ्या फ्री अँड फेअर निवडणुका कुठे होत नाहीत हे सर्वांना माहिती आहे. आणि या संदर्भात सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सगळे लोक जनतेत बोलतात, पण इलेक्शन कमिशननी बोलवल्यावर कोणी जात नाहीत. इलेक्शन कमिशनसमोर शपथपत्र द्यायला तयार नाहीत. सांगतात आम्ही संसदेत शपथ घेतली आहे. संसदेतली शपथ जर सुप्रीम कोर्टात सांगितलं चालेल का? हायकोर्टात सांगितलं चालेल का? तसंच कोणत्याही न्यायप्रकरणात जर शपथपत्र मागितलं जात असेल, तर तुम्ही शपथपत्र का देत नाही? कारण तुम्हाला माहिती आहे की तुम्ही खोटं बोलत आहात. आणि तुमचं खोटं पकडलं गेलं आणि ते शपथपत्रावर दिलं, तर उद्या तुमच्यावर फौजदारी कारवाई होऊ शकते. आणि म्हणून रोज खोटं बोलायचं आणि पळून जायचं – असे पळपुटे लोक आहेत.”
फडणवीसांनी स्पष्ट शब्दांत म्हटलं की, “शरद पवारांचे वक्तव्य म्हणजे राहुल गांधी भेटीचा परिणाम आहे.” तसेच, इतके दिवस पवारांनी या विषयावर भाष्य का केले नाही, हाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. काही दिवसांपूर्वी पवारांनी पत्रकार परिषदेत अनेक आरोप केले होते, त्यावरही फडणवीसांनी ही प्रतिक्रिया दिली.