थोडक्यात
मतदाराची ओळख पटण्यासाठी नवीन ई-साईन फीचर
मतदार याद्यातील गैरप्रकार रोखण्यासाठी आयोगाची पावले
निवडणुका आयोगाकडून दुरुस्त्यांसाठी ई-पडताळणीचा निर्णय
(Election Commission) मतदार यादीतील गैरवापर थांबवण्यासाठी निवडणूक आयोगाने नवी प्रणाली लागू केली आहे. आता मतदार म्हणून नोंदणी करणे, नाव वगळणे किंवा दुरुस्ती करणे यासाठी अर्ज करताना आधार-लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकाच्या मदतीने ई-पडताळणी करावी लागणार आहे. आयोगाच्या संकेतस्थळ व मोबाईल ॲपवर ‘ई-साइन’ फीचर जोडले असून या प्रक्रियेद्वारे अर्जदाराची ओळख सुनिश्चित केली जाणार आहे.
गेल्या आठवड्यात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतदार याद्यांतील नाव वगळण्याच्या प्रक्रियेत गैरप्रकार होत असल्याचा आरोप केला होता. विशेषतः कर्नाटकातील आळंद मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर खोटे अर्ज दाखल झाल्याची बाब समोर आल्यानंतर आयोगाने तात्काळ सुधारणा करण्याचा निर्णय घेतला.
आधीच्या पद्धतीनुसार अर्जदाराचा मोबाईल क्रमांक मतदार ओळखपत्राशी जोडून अर्ज करता येत असे, मात्र माहिती खरी आहे की नाही याची पडताळणी केली जात नव्हती. आता अर्ज क्रमांक 6 (नवीन नोंदणी), अर्ज क्रमांक 7 (नाव समाविष्ट किंवा वगळण्याविषयी आक्षेप) आणि अर्ज क्रमांक 8 (नोंदणी दुरुस्ती) भरताना ई-साइनची अट अनिवार्य केली गेली आहे.