थोडक्यात
राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस सुरू
कर्जमाफीबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती
पावसामुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान
गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, अनेक शेतकऱ्यांची जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आता सरकारच्या मदतीची गरज आहे. अशातच आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत राज्यातील पावसाच्या आणि शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर भाष्य केले आहे. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल असं शिंदे यांनी म्हटले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
राज्यात शेतीचे मोठे नुकसान – एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, ‘राज्यातील अनेक भागात ढगफुटीसदृष्य पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील मातीही वाहून गेली आहे. या मुद्द्यांवर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. शेतीच्या नुकसानीचे युद्धपातळीवर पंचनामे केले जात आहेत. अनेक लोकांच्या घरांची पडझड झाली आहे, त्यांनाही मदत जाहीर केली जाईल.’
पुढे बोलताना उपमुख्यमंत्री म्हणाले की, ‘शासन म्हणून आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत, शेतकऱ्यांचे पंचनामे युद्धपातळीवर केले जातील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या सोलापूर दौऱ्यावर जाणार आहेत. मीही धाराशिवला जाणार, इतर मंत्रीही पाहणी दौऱ्यावर जाणार आहेत. पावसामुळे साथीचे आजार होण्याची शक्यता आहे. याबाबत आरोग्य विभाग सतर्क आहे. जीवनावश्यक वस्तू विविध ठिकाणी पाठवण्यात आल्या आहेत, यात पीठ, कपडे, भांडी, औषधे, साड्या यांचा समावेश आहे.
दिवाळीपर्यंत मदत दिली जाणार – एकनाथ शिंदे
शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत आणि कर्जमाफीबाबत बोलताना शिंदे म्हणाले की, पंचनामे झाल्यानंतर शेतकऱ्यांना मदत दिली जाईल. दिवाळीपूर्वी सर्व शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचली जाईल. कर्जमाफीबाबत सरकार गंभीर आहे, याबाबत योग्य वेळी निर्णय घेतला जाईल. आम्ही केंद्र सरकारच्या संपर्कात आहोत, दोन्ही सरकारांकडून मदत केली जाईल, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. युद्धपातळीवर मदत देण्याचा आमचा प्रयत्न आहे.