पुण्यातील दिवे घाट परिसरात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा मुलगा आदित्य हाके याच्यावर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. लक्ष्मण हाके यांनी पोलिसांकडे तात्काळ कारवाई करून आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे.
हल्ला कोणी आणि का केला हे अजून स्पष्ट झालेले नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून लक्ष्मण हाके हे मराठा आरक्षणाला विरोध करत असल्याने, या हल्ल्याचा संबंध आरक्षणाच्या आंदोलनाशी जोडला जातोय का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. हाके यांचे म्हणणे आहे की, ओबीसीच्या आरक्षणावर कुठलाही गदा येऊ नये आणि मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे.
याआधीच पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील निरा येथे लक्ष्मण हाके यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली होती. तेथील हॉटेलमध्ये थांबले असताना काही तरुणांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. पोलिसांनी त्या तरुणांना ताब्यात घेतले होते. याच दरम्यान आता त्यांच्या मुलावर हल्ला झाल्याने परिस्थिती आणखी तणावपूर्ण झाली आहे.
मुंबईत मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी उपोषण करत आहेत. सरकारकडून त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आंदोलक करत आहेत. त्यातच हाके सतत मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलत असल्याने वातावरण अधिक तापले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर हल्ला झाल्याचा आरोप त्यांनी केला होता आणि आता त्यांच्या मुलावर झालेल्या हल्ल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी गढूळ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.