सध्या सोशल मीडियावर एक विचित्र पण गोंडस बाहुली प्रचंड ट्रेंड करत आहे. तिचं नाव आहे लाबुबू (Labubu Doll). तिचे मोठे दात, वाकडे डोळे आणि राक्षसी हास्य हे लोकांना एकाच वेळी भितीदायक आणि मजेशीर वाटत आहेत. ही बाहुली आता केवळ एक खेळण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर जगभर प्रसिद्ध एक ब्रँड बनली आहे.
लाबुबूची रचना प्रसिद्ध कलाकार Kasing Lung यांनी केली आहे. चीनमधील आघाडीची खेळणी बनवणारी कंपनी Pop Mart हिने ही बाहुली बाजारात आणली. आज ही बाहुली जगभरातील तरुण आणि संग्राहकांची (collectors) आवडती झाली आहे.
लाबुबू दिसायला विचित्र असली तरी तितकीच आकर्षक आणि गोंडस आहे. अनेक लोक तिला "अगली क्यूट" (भितीदायक पण गोंडस) म्हणून संबोधतात. तिच्या अनोख्या लूकमुळे सोशल मीडियावर तिचे फोटो सतत व्हायरल होत आहेत.
Pop Mart ने लाबुबूची विक्री "ब्लाइंड बॉक्स" तत्त्वावर सुरू केली. म्हणजेच ग्राहकाला आधी माहीत नसतं की बॉक्समध्ये नेमकी कोणती बाहुली आहे. हाच सस्पेन्स आणि उत्सुकता यामुळे लोक पुन्हा पुन्हा ती खरेदी करतात. काही तर आवडती बाहुली मिळेपर्यंत सतत खरेदी करत राहतात.
बीजिंगमध्ये लाबुबूच्या एका मोठ्या बाहुलीचा लिलाव तब्बल 1.2 कोटींना झाला होता. तिच्या छोट्या आवृत्त्या देखील लाखो रुपयांना विकल्या जात आहेत. अनेक संग्राहक ती गुंतवणूक म्हणूनही खरेदी करत आहेत.
लाबुबूच्या यशामुळे Pop Mart कंपनीने अब्जावधींची कमाई केली आहे. कंपनीचे सीईओ वांग निंग हे आता चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये गणले जातात. कंपनीने आता NFTs आणि ऑनलाइन कलेक्टिबल्स अशा डिजिटल प्लॅटफॉर्म्समध्येही प्रवेश केला आहे.
आज लाबुबू ही फक्त एक बाहुली उरलेली नाही, ती लोकांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि शैलीचा भाग बनली आहे. लोकांचा तिच्याशी भावनिक संबंध निर्माण झाला आहे. याच भावनिक आणि सांस्कृतिक जोडीनं लाबुबूला जागतिक लोकप्रियता मिळवून दिली आहे.