Heavy Rain Alert : उत्तर भारतात पूरस्थिती गंभीर! मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती, तर आतापर्यंत अनेकांचा बळी
भारतातील उत्तरेकडील राज्यांवर मुसळधार पावसाचा तडाखा सुरू असून जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान आणि उत्तर प्रदेशात नैसर्गिक आपत्तीमुळे आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू झाला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) या भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून आगामी दोन दिवसांत अतिवृष्टीची शक्यता व्यक्त केली आहे.
शनिवारी झालेल्या ढगफुटी आणि मुसळधार पावसामुळे जम्मू-काश्मीरमधील रांबन, उधमपूर आणि रेासी जिल्ह्यांत दरडी व पूराचे घटनांचे प्रमाण वाढले. महोर तहसीलमध्ये एका कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू झाला आहे. रांबन येथे 4 जणांचा मृत्यू झाला असून शोध मोहीम अद्याप सुरू आहे. उधमपूर जिल्ह्यात दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.
उत्तराखंडात चमोली, रुद्रप्रयाग, टिहरी व बागेश्वर जिल्ह्यांत ढगफुटी आणि भूस्खलनामुळे नद्यांना पूर आला. प्रशासनाने नागरिकांना नदीकाठापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. राजस्थानात झालेल्या रात्रीच्या पावसामुळे जयपूरमध्ये पाणी साचले व वाहतुकीवर परिणाम झाला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, हिमाचल प्रदेशात 31 ऑगस्ट रोजी, उत्तराखंडात 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर, पूर्व राजस्थानात 31 ऑगस्ट आणि उत्तर प्रदेशात 1 सप्टेंबर रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
दरम्यान, दिल्लीमध्ये रविवारी सर्वसाधारणपणे ढगाळ हवामान राहणार असून काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस, गडगडाट व विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, राजधानीतील तापमान सरासरीपेक्षा 2 ते 3 अंशांनी कमी राहील.प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे, अनावश्यक प्रवास टाळण्याचे आणि हवामान खात्याचे निर्देश पाळण्याचे आवाहन केले आहे.