राजकारण

मराठा आणि ओबीसी आरक्षणाची ताट वेगळी राहिली तरच...; प्रकाश आंबेडकरांचे विधान

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नांदेड : भाजपचा अजेंडा आहे की, आम्हाला संविधान बदलायचं आहे. संविधान वाचलं तर आरक्षण वाचेल, संविधान नाही वाचलं तर आरक्षण कसं वाचेल? असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ते नांदेड येथील ओबीसी मेळाव्यात बोलत होते.

आपल्याला मिळालेलं आरक्षण टिकवायचं आहे. मोर्चे काढून, आंदोलने करून जागृती होते. पण मिळालेलं टिकवायचं असेल तर सत्तेत गेलं पाहिजे. ओबीसींच्या हातात सत्ता आली पाहिजे. त्यासाठी कबाब, शबाब आणि महात्मा गांधी (पैसे) यांचा त्याग केला पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

शासनाला कोणाला जात देता येत नाही, आस्तित्वात असणारी जात मागासवर्गीय आहे का नाही? एवढंच सांगण्याचा अधिकार त्यांना असतो. नव्या जातीला जन्म देणं हा शासनाचा अधिकार नाही आणि तो अधिकार संविधानाने त्यांना दिला नाही, असे म्हणत आंबेडकरांनी राज्य सरकारवर टीका केली. मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण यावर भाष्य करताना ते म्हणाले की, सडलेले नेतृत्व त्यांच्या समाजालाही न्याय देत नाही आणि आपल्यालाही न्याय देत नाही. जर, जरांगे पाटलांसारखं नेतृत्व पुढं येत असेल तर आपण त्याचं स्वागत केलं पाहिजे. पण, आमच्या ताटात येऊ नको, वेगळं ताट पाहिजे असेल तर आम्ही तुम्हाला मदत करतो, असं त्यांना सांगितलं पाहिजे. मराठा आणि ओबीसी आरक्षणाची ताट जर वेगळी राहिली तर, या महाराष्ट्रात बदल घडू शकतो, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी आंबेडकरांनी आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांच्यावरही निशाणा साधला. मी दोन-तीन वेळा मोहन भागवतांची भेट मागितली होती, पण झाली नाही. या संविधानात काय वाईट आहे ते सांगा? असं मी त्यांना विचारणार होतो. तुमचं पटलं तर तुमच्यासोबत येतो आणि नाही पटलं तर आमच्यासोबत या असं मी त्यांना सांगणार होतो, अशी खोचक टीकाही त्यांनी केली. महात्मा फुले-शाहू महाराज-डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सामान्य माणसांपर्यंत सत्ता आणून दिली. सामान्यातला सामन्य माणूस सत्ताधारी होऊ शकतो. हे अध्यक्षीय लोकशाही आल्यावर होऊ शकते का? असा सवाल त्यांनी उपस्थितांना विचारला.

जो लढा फुले-शाहू-आंबेडकरांनी सुरू केला की, शिक्षण हे सर्वांच्या दारी असलं पाहिजे. कारण, शिक्षण हे वाघिनीचे दूध आहे जो घेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची आठवणही त्यांनी यावेळी करुन दिली. काँग्रेस वाल्याचा, भाजप वाल्याचा आणि राष्ट्रवादीचा पोरगा कोणी दंगलीत बघितला आहे का? असा सवाल करत आंबेडकरांनी सांगितले की, दंगलीत सामान्य माणसं असतात, आपल्याकडे दंगल कर म्हणून कोणी सांगायला आलं तर त्यांना सांगा की, आधी तुझा पोरगा पुढं कर आम्ही त्याच्या मागे उभा राहतो.

राजकारणातील नैतिकता खूप महत्वाची आहे, ज्या समूहाकडे नैतिकता आहे त्या समुहाकडे सत्ता आहे, हे लक्षात घ्या. इथले राजकारणी हे, त्यांच्या घराचे उंबरठे झिजवणारा समुह निर्माण करणारे राजकारण करत आहेत. आपल राजकारण हे, इथला माणूस ताठ मानेनं जगणारा असावा, कोणापुढे झुकणारा नसावा यासाठी असलं पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. हे संविधान महात्मा फुले-शाहू महाराज यांच्या विचारांचे आहे. संविधान टिकलं तरचं आपले अधिकार टिकणार आहेत, असेही आंबेडकरांनी नमूद केले.

देश तोडण्याची भूमिका घेणाऱ्या काँग्रेसला अमित शहांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले; "भारताचं विभाजन..."

Jayant Patil : भुजबळ साहेब नाराज हे आम्ही ऐकून आहे

Summers: उन्हातून घरी आल्यावर चुकूनही करू नका 'या' गोष्टी...

India Alliance Meeting : बीकेसीत इंडिया आघाडीचं शक्तिप्रदर्शन, मविआ उमेदवारांच्या प्रचारासाठी होणार सभा

Anil Deshmukh : तटकरे साहेब हॉटेलमध्ये आमच्या कार्यकर्त्यांना भेटले; आमच्या संपर्कात जरी ते आले तरी आम्ही त्यांना घेणार नाही