सुनावणीला सतत गैरहजर राहिल्याबद्दल लखनऊच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने राहुल गांधी यांच्यावर 200 रुपयांचा दंड ठोठावला. तसेच 14 एप्रिल 2025 रोजी न्यायालयात हजर राहावे, जर ते या तारखेलाही हजर राहिले नाहीत तर कठोर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते, असा इशारा देखील राहुल गांधींना दिला.
तक्रारदार नृपेंद्र पांडे यांच्या मते, राहुल गांधी यांनी 17 डिसेंबर 2022 रोजी महाराष्ट्रातील अकोला येथे आयोजित पत्रकार परिषदेत स्वातंत्र्यसैनिक वीर सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्यांनी सावरकरांना 'ब्रिटिशांचे सेवक' आणि 'पेन्शनधारक' म्हटले होते.
समाजात द्वेष पसरवण्याच्या उद्देशाने हे विधान देण्यात आल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे. एवढेच नाही तर पत्रकार परिषदेत पत्रकारांमध्ये पूर्व-तयार पत्रके देखील वाटण्यात आली. या विधानावर भारतीय दंड संहितेच्या कलम 153 (अ) आणि 505 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.