मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक मुद्यांवर चर्चा केली. तसेच त्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांवरही भाष्य केले आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की, "आज मी त्र्यंबकेश्वरला जाऊन दर्शन घेतले. तेथील आराखड्याचे प्रशासनाकडून प्रेझेंटेशन घेतले आहे. त्याचप्रमाणे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकचा विकास आपण करणार आहोत. त्र्यंबकेश्वर हे प्रमुख ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. त्या ठिकाणी देशभरातून लोक तिथे येतात. यासाठी 1100 कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे. दोन टप्पे आहेत. पहिला टप्पा कुंभमेळ्यापूर्वी पूर्ण करता येईल आणि दूसरा टप्पा त्यानंतर पूर्ण होईल".
"दर्शनाकरीता कॉरिडोर तयार करणार, पार्किंगची व्यवस्था आणि शौचालयांची व्यवस्था असेल, आपली जी तिथे वेगवेगळी कुंड आहेत त्या कुंडांच रिस्टोरेशन, प्रमुख मंदिरांच रिस्टोरेशन, वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी करण्यात आल्या आहेत".
त्याचप्रमाणे मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, "नाशिकमध्ये 11 पुल बांधत आहोत. रस्त्यांच मोठ जाळ तयार करत आहोत. घाट वाढवत आहोत, सोयीसुविधा वाढवणार आहोत. कोणत्याही परिस्थितीत सिंहस्थ कुंभ मेळ्याआधी काम पूर्ण करण्याची योजना आहे. या सगळ्या विकासकामांसाठी खूप मोठ्या प्रमाणात निधी लागणार आहे, पण राज्य सरकार म्हणून मी, एकनाथ शिंदे अजितदादा आम्ही तिघांनी निर्णय घेतला आहे. यासाठी कुठल्याही निधीच कमतरता पडू देणार नाही.