आज दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा नारायण गड येथे दसरा मेळावा पार पडला. यात मनोज जरांगे-पाटील यांनी भावनिक भाषण करत महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले. मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बरी नसताना देखील त्यांनी या मेळाव्याला हजेरी लावली आहे.
या मेळाव्याला हजारोंच्या संख्येनं लोक उपस्थित आहेत.आपल्या आरोग्याबद्दल बोलताना ते भावुक झाले आणि "मी थोड्या दिवसांचा पाहुणा आहे, पण माझ्या डोळ्यांसमोर मराठा लेकरांना आरक्षण मिळालेले पाहायचे आहे," असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. समाजातील गरीब विद्यार्थ्यांचे आणि कुटुंबांचे कल्याण हेच आपल्या आयुष्याचे ध्येय असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
याच पार्श्वभूमिवर मनोज जरांगे पाटील यांनी राज्यात पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीवर आणि त्यांना मदत मिळावी म्हणुन या मेळाव्यादरम्यान ओला दुष्काळासह हेक्टरी 70 हजार देण्याची मागणी करत, 8 महत्त्वाच्या मागण्या सरकारसमोर मांडल्या आहेत.
दसरा मेळाव्यादरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या 8 मागण्या कोणत्या?
शेती वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना 1 लाख 30 हजार मदत द्या.
सरकारनं शेतीला नोकरीचा दर्जा द्यावा, महिन्याला 10 हजार द्या.
शेतकऱ्याला हेक्टरी 70 हजार मदत द्यावी.
दिवाळीआधी ओला दुष्काळ जाहीर करा.
सरकारनं शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी.
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना शासकीय नोकरी द्या.
शेतकऱ्यांच्या मालाला योग्य तो हमीभाव द्या.
बसवलेले पिकविम्याला 3 ट्रीगर हटवा, पूर्ण पिकविमा द्या.