उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन आपल्या अजब-गजब निर्णयांसाठी नेहमीच चर्चेत राहतात. यावेळी त्यांनी देशात लोकप्रिय असलेल्या ‘आईस्क्रीम’ या शब्दावर बंदी आणली आहे. किम यांच्या मते ‘आईस्क्रीम’ या नावातून परदेशी प्रभाव दिसून येतो. त्यामुळे यापुढे उत्तर कोरियात या पदार्थाला ‘एसीयुकिमो’ किंवा ‘इयूरियुंबोसेउंगी’ या नावाने ओळखले जाणार आहे. या शब्दांचा अर्थ ‘बर्फापासून बनवलेली मिठाई’ असा होतो.
‘डेली एनके’च्या रिपोर्टनुसार, किम जोंग उन यांची इच्छा आहे की, उत्तर कोरियातून दक्षिण कोरियाई आणि पाश्चात्य शब्दांचा प्रभाव पूर्णपणे हटवला जावा. त्यांच्या मते, परदेशातून कुणी पर्यटक उत्तर कोरियात आले, तर त्यांचा प्रभाव इथल्या जनतेवर पडायला नको. उलट पर्यटकांनी उत्तर कोरियातून काहीतरी शिकून परत जावं, हीच त्यांची भूमिका आहे. त्यामुळेच इंग्रजी किंवा परदेशी शब्दांना पूर्णविराम देण्यासाठी टूरिस्ट गाइड्सना प्रशिक्षण देणारे एक नवं केंद्र सुरू करण्याची तयारीही सुरू आहे.
उत्तर कोरियात पर्यटन क्षेत्रातील गाइड्स इंग्रजीसह परदेशी भाषेतील शब्द वापरून संवाद साधत होते, जेणेकरून परदेशी पर्यटकांना समजायला सोपे जाईल. मात्र, नव्या फर्मानामुळे त्यांची अडचण वाढली आहे. एका ट्रेनी गाइडने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले, “परदेशी पर्यटकांशी संवाद सोपा व्हावा म्हणून आम्ही इंग्रजी शब्द वापरत होतो. पण आता किम जोंग उन यांच्या निर्णयामुळे आमची कोंडी झाली आहे. या आदेशाला विरोध करण्याची हिंमत कुणामध्ये नाही. टूर गाइडचं काम चांगलं आहे, पण चुकीच्या प्रतिक्रियेमुळे संकट ओढवू नये म्हणून आम्ही गप्प राहतो.”
किम जोंग उन यांनी सुचवलेला ‘एसीयुकिमो’ हा शब्द आर्क्टिक प्रदेशातील लोकांच्या बोलीतून घेतल्याचे सांगितले जाते. अलास्का, कॅनडा, ग्रीनलँड आणि सायबेरियासारख्या बर्फाळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना ‘एस्किमो’ नावाने ओळखले जाते. मात्र, ‘एस्किमो’ ही संज्ञा अनेक ठिकाणी वादग्रस्त ठरली असून सांस्कृतिक ओळखीबाबत विविध समुदायांना वेगवेगळी नावं प्रिय आहेत. त्यातच भाषातज्ज्ञांच्या मते किम जोंग उन यांनी वापरायला सांगितलेले नवीन शब्दसुद्धा प्रत्यक्षात इंग्रजीतूनच घेतलेले आहेत.
थोडक्यात, उत्तर कोरियात ‘आईस्क्रीम’ शब्दाचा वापर आता इतिहासजमा झाला असून, त्याऐवजी किम जोंग उन यांनी सुचवलेले स्थानिक शब्द वापरावे लागणार आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे जगभरात पुन्हा एकदा किम यांच्या कारभाराची खिल्ली उडवली जात असून, उत्तर कोरियातील टूर गाइड्स मात्र नव्या संकटात सापडले आहेत.