ऑपरेशन सिंदूर operation sindoor नंतर काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू असताना, पहलगाम Pahalgam येथील हल्लेखोर अजूनही पकडेत नाहीत. सीमेवर तणावपूर्ण वातावरण असून बीएसएफ BSF अत्यंत दक्षतेने पहारा देत आहे. यापार्श्वभूमीवर पाकिस्तानने दहशतवाद्यांना नेपाळच्या सीमेमार्गाने भारतात घुसवण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे 37 पेक्षा अधिक पाकिस्तानी आणि बांगलादेशी संशयित घुसखोर नेपाळ सीमेजवळ दबा धरून बसले आहेत. त्यामुळे नेपाळ सीमावर्ती भागात खळबळ माजली असून सुरक्षेसाठी अतिरिक्त पथके तैनात करण्यात आली आहेत.
हे दहशतवादी लखनऊ, वाराणसी, अयोध्या आणि मथुरा यांसारख्या शहरांना लक्ष्य करु शकतात, अशी शक्यता लष्करी सूत्रांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे बहराइच ते बलरामपूर या नेपाळ सीमावर्ती भागात 1500 हून अधिक एसएसबी जवानांची अतिरिक्त तैनाती करण्यात आली आहे. एसएसबीच्या 42 व्या बटालियनने दुहेरी गस्त सुरु केली असून जंगल परिसरात एक नवीन चौकीही उभारण्यात आली आहे. नेपाळहून येणाऱ्या नागरिकांची ओळखपत्रे काटेकोरपणे तपासली जात आहेत. उत्तर प्रदेशातील महाराजगंज, सिद्धार्थनगर, बलरामपूर, बहराइच, श्रावस्ती, पिलीभीत आणि लखीमपूर खेरी या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. स्थानिक पोलीस, पीएसी आणि एसएसबी संयुक्तपणे गस्त घालत आहेत.
जारवा पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक गोविंद कुमार यांनी सांगितले की, गुरुंग नाका चौकी परिसरातून दोन्ही देशांदरम्यानची वाहतूक तात्पुरती थांबवण्यात आली आहे. ग्राम सुरक्षा समित्यांना सक्रीय करण्यात आले असून सीसीटीव्हीच्या साहाय्याने सतत नजर ठेवली जात आहे. सुरक्षा यंत्रणांनी संभाव्य धोका ओळखून सीमावर्ती भागात कडक बंदोबस्त तैनात केला आहे. ग्राम सुरक्षा समित्या, स्थानिक पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा दल संयुक्तपणे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. कोणतीही घुसखोरी होऊ नये यासाठी सीसीटीव्ही निगराणी आणि ओळखपत्रांची तपासणी अधिक कठोर करण्यात आली आहे. प्रशासन सज्ज असून नागरिकांनीही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.