आशिया कप 2025 स्पर्धेपूर्वी टीम इंडियाच्या माजी फिरकीपटूवर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 9 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आणि 28 सप्टेंबरला संपणाऱ्या या टी-20 स्पर्धेतील सामने यूएईमधील दुबई आणि अबू धाबी येथे खेळले जाणार आहेत.
क्रिकबझच्या माहितीनुसार, भारताचा माजी डावखुरा फिरकी गोलंदाज प्रज्ञान ओझा याची आशिया कपच्या तांत्रिक समितीत निवड करण्यात आली आहे. या समितीचा सदस्य म्हणून तो सामन्यांशी संबंधित वाद सोडवेल, तसेच स्पर्धेदरम्यान खेळाडूंच्या बदलीबाबत निर्णय घेईल. याशिवाय, स्पर्धा व्यवस्थित पार पडावी आणि नियमांचे पालन व्हावे, याची जबाबदारीही या समितीवर असेल. सामन्यांसाठी अधिकारी नियुक्त करण्याचे कामदेखील समितीमार्फत केले जाईल.
प्रज्ञान ओझाने खेळाडू म्हणून 24 कसोटी, 18 एकदिवसीय आणि 6 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने भारतासाठी खेळले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 113 बळी आहेत, तर एकदिवसीय सामन्यांत 21 आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत 10 बळी घेतले आहेत. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलमध्ये आणि भारतीय क्रिकेटर्स असोसिएशनमध्ये सदस्य म्हणूनही भूमिका बजावली आहे.
भारताचा जाहीर झालेला संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा, रिंकू सिंग, कुलदीप यादव.