Manoj Jarange : जरांगेंचं भगवं वादळ मुंबईकडे; 29 ऑगस्टला आझाद मैदान गाजणार
मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा तापला आहे. या प्रश्नाला न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मोठ्या निर्धाराने ‘चलो मुंबई’चा नारा दिला आहे. जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी गावातून सुरुवात होणाऱ्या या मोर्चात हजारो मराठा बांधव सहभागी होणार असून, 29 ऑगस्टच्या रात्री मुंबईतील आझाद मैदानावर हे आंदोलन एकवटणार आहे.
आंदोलनाचा प्रवास
जरांगे यांचा मोर्चा 27 ऑगस्ट रोजी सकाळी आंतरवली सराटी येथून सुरू होणार आहे. त्यानंतर हा मोर्चा शहागड फाटा, साष्ट पिंपळगाव, आपेगाव, पैठण कमान, घोटण, शेवगाव, मिरी नाका, पांढरी पुल, अहिल्यानगर बायपास, नेप्ती चौक, आळाफाटा असा प्रवास करणार आहे. या मार्गावरून जाताना मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी होतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. पहिल्या टप्प्यात जुन्नर येथे मुक्काम होईल.
28 ऑगस्ट रोजी शिवनेरी किल्ल्यावर दर्शन घेतल्यानंतर मोर्चा पुन्हा मार्गस्थ होईल. त्यानंतर राजगुरुनगर, खेड, चाकण, तळेगाव, लोणावळा, पनवेल, वाशी, चेंबूर मार्गे सरळ आझाद मैदानाकडे मोर्चा वळेल. 29 ऑगस्टच्या रात्री मुंबईत पोहोचल्यावर या आंदोलनाचा उग्र रूप पाहायला मिळेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.
गणेशोत्सवात आंदोलकांची धडक
नेमक्या या काळात मुंबईत गणेशोत्सवाची तयारी सुरू असते. शहरात लाखोंच्या संख्येने भाविकांचे आगमन होते. या गर्दीत जरांगे यांच्या मोर्चाचा समावेश होणार असल्याने प्रशासनाची मोठी कसोटी लागणार आहे. वाहतूक व्यवस्था, सुरक्षा, आंदोलकांची सोय, याकडे राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांनी विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.
राज्यभरातून जोरदार तयारी
दरम्यान, जरांगे यांच्या या मुंबई मोर्चासाठी राज्यभरातून जोरदार तयारी सुरू आहे. धाराशिव जिल्ह्यासह ग्रामीण भागात चलो मुंबई अशी बॅनर्स, फलक लावण्यात आले आहेत. गावागावांत चावडी बैठका घेऊन मराठा समाजाला जागरूक करण्यात येत आहे. मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने मुंबईत पोहोचावे, असे आवाहन गावोगावातून होत आहे.
सरकारला अंतिम अल्टीमेटम
मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा सरकारला अल्टीमेटम दिला आहे. 26 ऑगस्टपर्यंत मराठा समाजाच्या मागण्यांचा विचार झाला नाही, तर 27 तारखेला आम्ही मुंबईला निघू, असा इशारा त्यांनी दिला आहे. मराठा समाजाला ओबीसी आरक्षणातून योग्य न्याय मिळाला पाहिजे, हा मुद्दा त्यांनी ठामपणे मांडला आहे.