ताज्या बातम्या

Thackeray Brothers : सर्वात मोठी बातमी! मुंबईतील 'ही' निवडणुक ठाकरे बंधू एकत्र लढणार

गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेली युती अखेर निश्चित झाली आहे. शिवसेना ठाकरे पक्ष आणि मनसे आगामी बेस्ट कामगार सहकारी पतसंस्था निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे.

Published by : Prachi Nate

गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेली युती अखेर निश्चित झाली आहे. शिवसेना (ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं (मनसे) आगामी बेस्ट कामगार सहकारी पतसंस्था निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. बेस्टच्या कर्मचार्‍यांच्या कल्याणाशी संबंधित असलेल्या या निवडणुकीसाठी ही युती केवळ संघटनात्मक पातळीवरच नव्हे, तर भविष्यातील राजकीय समीकरणांवर परिणाम करणारी ठरू शकते, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

बेस्ट कामगार सेना (उद्धव ठाकरे गटाशी संलग्न) आणि मनसे कर्मचारी सेना यांनी एकत्र निवडणूक लढवण्याची अधिकृत घोषणा केली आहे. ही निवडणूक 18 ऑगस्ट 2025 रोजी होणार आहे. या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी बेस्ट कामगार सेना अध्यक्ष सुहास सामंत आणि मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांच्यात मागील काही आठवड्यांपासून चर्चा सुरू होत्या. अखेर वरिष्ठ नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही संघटनांनी ही युती निश्चित केली आहे.

बेस्ट सहकारी पतसंस्था ही फक्त आर्थिक संस्था नाही, तर ती कामगारांमध्ये असलेल्या विश्वासाचे प्रतिनिधीत्व करते. या निवडणुकीत ज्या संघटनेचा पॅनल विजयी ठरतो, त्यांची पकड बेस्ट उपक्रमात अधिक मजबूत होते. त्यामुळे ही निवडणूक आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी दिशादर्शक ठरू शकते.

दोन्ही संघटनांनी युतीचा आधार मराठी अस्मिता आणि रोजगाराच्या मुद्द्यांवर ठेवला आहे. बेस्टमधील कर्मचाऱ्यांपैकी बहुतांश जण शिवसेना किंवा मनसेशी जवळीक असलेले आहेत. काही पदाधिकारी तर दोन्ही संघटनांमध्ये कार्यरत आहेत. यामुळे या युतीमुळे बेस्टमधील मराठी कामगारांची शक्ती पुन्हा एकवटली जाईल, अशी भावना व्यक्त होत आहे.

उद्धव ठाकरे सरकारच्या काळात बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी काही महत्त्वपूर्ण निर्णय झाले होते. ग्रॅज्युएटीसारख्या बाबतीत महापालिका प्रशासन नियमित निधी देत होते. मात्र, जून 2022 नंतर सत्तांतर झाल्यानंतर, कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या मार्गी लागत नसल्याने नाराजी वाढली आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युएटी रखडलेली आहे आणि नवीन भरतीही ठप्प आहे. बेस्टच्या स्वमालकीच्या बसेसची संख्याही घटत चालली आहे.

सध्या बेस्ट पतपेढीमध्ये शिवसेना (ठाकरे गट) संलग्न बेस्ट कामगार सेनेची सत्ता आहे. गेल्या 9 वर्षांमध्ये कामगार कल्याणासाठी विविध उपक्रम राबवले गेले असून त्याला कर्मचारी वर्गाकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याचे बोलले जाते. आता मनसेच्या सहभागामुळे ही ताकद अधिक वाढेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे यांच्यातील ही युती सध्या फक्त कामगार पतपेढीपुरती असली, तरी ती राजकीयदृष्ट्या मोठ्या बदलांची नांदी ठरू शकते. ठाकरे बंधू पुन्हा एकत्र आल्याने मराठी माणसाच्या एकजुटीचा नवा अध्याय सुरु होणार आहे, अशी अपेक्षा आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Rahul Gandhi : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत राहुल गांधींचा मोठा खुलासा; म्हणाले...

Devendra Fadnavis : "टार्गेट केलं गेलं..." मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा खुलासा

Mumbai Kabutar Khana Hearing : कबुतरखान्यांवरील बंदीवर कोर्टाचा मोठा निर्णय! कबूतरांच्या अन्नपाण्यावर स्थगिती कायम

Narali Poornima 2025 : नारळी पौर्णिमा का साजरी केली जाते? , जाणून घ्या..