MNS Leader Trolls Sandeep Deshpande : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. कारण ठरले आहे त्यांचेच उपहारगृह ‘इंदुरी चाट आणि बरंच काही…’. भाजप कार्यकर्त्यांनी यावरुन देशपांडेंना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
दादरच्या मध्यवर्ती भागात काही महिन्यांपूर्वी देशपांडेंनी हे उपहारगृह सुरू केले. ‘इंदुरी चाट’ हा मध्य प्रदेशातील लोकप्रिय पदार्थ असल्याने उपहारगृहाचे नाव तसे ठेवण्यात आले. मात्र येथे काम करणारे कुक परप्रांतीय असल्याचा मुद्दा आता चव्हाट्यावर आला आहे. मनसे नेते नेहमी मराठी भाषा, स्थानिकांना रोजगार आणि भूमिपुत्र हक्क यासाठी आवाज उठवतात, याची आठवण करुन देत भाजप कार्यकर्ते त्यांच्यावर टीका करत आहेत.
अलीकडेच नामांकित शेफ शिप्रा खन्ना आणि रश्मी उदयसिंग यांनी या उपहारगृहाला भेट दिली होती. त्याचे फोटो आणि माहिती देशपांडेंनी स्वतः सोशल मीडियावर शेअर केली. याच पोस्टवरून विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधत, “हॉटेलचं नाव परप्रांतीय, कूक परप्रांतीय, प्रमोशन परप्रांतीय – मग मराठी आचारी कुठे?” असा सवाल उपस्थित केला आहे.
सोशल मीडियावर देशपांडेंना ट्रोल करताना एका कार्यकर्त्याने तर राज ठाकरे आणि देशपांडे यांचा फोटो शेअर करून “हमारे संदीप भय्या के दुकान में अनेका हा” असे लिहिले. निवडणुकीपूर्वीचा हा छोटासा मुद्दा आता चर्चेचा विषय ठरला असून, मनसे नेत्यांच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर वातावरण तापवले आहे.