नवी दिल्ली : ब्रिटनमध्ये आता भारतीय वंशाचे ऋषी सुनक पंतप्रधान पदी विराजमान झाल्याने एक नवा इतिहास रचला गेला आहे. ब्रिटनने भारतीयांना 150 वर्षे गुलाम बनवून ठेवले, ते ब्रिटन आता एक भारतीय चालवणार आहे. याशिवाय युनायटेड किंगडमचे पंतप्रधान बनणारे ते आशियाई वंशाचे पहिले व्यक्ती देखील आहेत.
कोण आहेत ऋषी सुनक?
ब्रिटनचे नवे पंतप्रधान ४२ वर्षीय ऋषी सुनक हे भारतीय वंशाचे आहेत. त्यांचा जन्म 1980 मध्ये इंग्लंडमध्ये झाला. त्यांचे वडील यशवीर हे डॉक्टर, तर आई उषा या फार्मासिस्ट आहेत. सुनक यांचे आजी-आजोबा मुळचे पंजाबचे. त्यांचे शिक्षण प्रख्यात विन्चेस्टर कॉलेजमध्ये झाले आहे. त्यांनी तत्वज्ञान, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्राचे शिक्षण ऑक्सफर्डमध्ये घेतले. तर कॅलिफोर्नियातील स्टॅनफोर्ड विद्यापीठातून एमबीए पदवी घेतली. सुमारे तीन वर्षे त्यांनी खासगी कंपन्यांमध्ये महत्त्वाच्या पदांवर काम केले.
यानंतर ऋषी सुनक यांनी पहिल्यांदा 2015 मध्ये संसदेची निवडणूक जिंकली होती. बोरिस जॉन्सन सरकारच्या काळात सुनक अर्थमंत्री होते. 5 जुलै रोजी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.यानंतर सोमवारी ऋषी सुनक यांची ब्रिटनच्या पंतप्रधान पदी निवड झाली. या पदापर्यंत मजल मारणारे ऋषी हे पहिलेच भारतीय ठरले आहेत.
विशेष म्हणजे इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांचे ऋषी सुनक जावई आहेत. मुर्ती यांची कन्या अक्षता आणि सुनक यांची भेट स्टॅनफोर्ड विद्यापीठात झाली. २००९ मध्ये ते विवाहबद्ध झाले. त्यांना कृष्णा आणि अनुष्का या मुली आहेत.
दरम्यान, पंतप्रधान मोदींनी ऋषी सुनक यांचे ब्रिटनचे पंतप्रधान झाल्याबद्दल अभिनंदनापर ट्विट केले. ऋषी सुनक यांचे मनःपूर्वक अभिनंदन! तुम्ही यूकेचे पंतप्रधान बनणार आहात. मी जागतिक समस्यांवर एकत्र काम करण्यास आणि रोडमॅप 2030 ची अंमलबजावणी करण्यास उत्सुक आहे. ब्रिटीश भारतीयांचा 'व्हायब्रंट ब्रिज'. दिवाळीच्या विशेष शुभेच्छा तुमच्यासाठी. आम्ही ऐतिहासिक संबंधांचे आधुनिक भागीदारीत रूपांतर केले आहे, असे माोदींनी ट्विटमध्ये म्हंटले आहे.