प्रशांत कोरटकर याने इंद्रजित सावंत यांना धमकी देताना छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. प्रशांत कोरटकर याचा गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस शोध घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता प्रशांत कोरटकर दुबईला पळून गेल्याची चर्चा सुरु आहे. याबाबत त्याचा एक फोटो व्हायरल होत असून कोरटकर कोलकातामार्गे दुबईला पळून गेल्याची माहिती मिळत आहे. प्रशांत कोरटकर याने काही दिवसांपूर्वी आपल्या वकिलांद्वारे मुंबई हायकोर्टात अटक पूर्व जामीनासाठी याचिका दाखल केली होती. पण हायकोर्टाने प्रशांत कोरटकर याला अटकपूर्व जामीन द्यायला नकार दिला होता.
याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, राज्याचे गृहखातं हे देवेंद्र फडणवीस सांभाळतात. जे एक महान व्यक्तीमत्व या देशातलं आहे. त्यांच्या एवढे महान व्यक्तीमत्व अजून निर्माण झालेले नाही असं दिसतंय. प्रशांत कोरटकर हा नागपूरचाच आहे ना. दंगल नागपूरला होते. पण दंगल नागपूरलाच का झाली? हा प्रश्न एकट्या संजय राऊत यांचा नाही आहे.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, फडणवीसांचे सरकार हे मनोरुग्णांचं सरकार आहे. कोरटकर हा नागपूरचाच त्यांचाच माणूस आहे ना. आता तो पळून गेलाय की नाही ते सांगतील. उद्या आम्ही म्हणायचो पळून गेला आणि कुठेतरी तो भाजपच्या कार्यालयात सापडायचा. भारतीय जनता पक्षाच्या राजवटीमध्ये काहीही होऊ शकते. खरोखर हा कोरटकर पळून गेला असेल तर गृहखात्याच्या मदतीशिवाय ते हे पलायन करु शकत नाही. जर तो पळून गेला असेल नागपूरच्या पोलीस आयुक्तांचा राजीनामा किंवा त्यांची बदली केली पाहिजे. असे संजय राऊत म्हणाले.