बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया देखील येत आहेत. अनेक ठिकाणी या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत. बीडच्या मस्साजोग गावात संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख आज आंदोलन करत आहेत. धनंजय देशमुख यांच्याकडून पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करण्यात येत आहे.
मस्साजोगमध्ये मनोज जरांगे पाटील आले असून त्यांनी स्वत: धनंजय देशमुख यांच्याशी मोबाइलवरुन संपर्क साधला आणि त्यांना खाली येण्याचे आवाहन करण्यात आले. जरांगेंकडून धनंजय देशमुख यांची समजून काढण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
'तुम्ही खाली या, मी रात्रीच सांगितले होते ना मी येतो म्हणून. आहे ना एवढा मोठा मराठा समाज. आम्हाला, तुमच्या कुटुंबाला तुमची गरज आहे. प्लीज खाली या' तुमच्या कुटुंबाला आधाराची गरज आहे. संतोष भैय्याला न्याय द्यायचा आहे. खाली या. प्लिज माझी विनंती आहे. असे मनोज जरांगे पाटील यांनी फोनवरुन धनंजय देशमुख यांच्याशी संवाद साधला.