ताज्या बातम्या

“इतरांच्या अंतर्वस्त्रास हात घालाल तर…”; शिवसेनेचा भाजपाला इशारा

सध्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा सुरु आहे. या यात्रेवरुन त्यांच्यावर राहुल गांधी यांच्यावर टीका करण्यात येत आहे. त्यांनी जे टि- शर्ट घातले होते. त्यावर प्रतिक्रिया येत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

सध्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा सुरु आहे. या यात्रेवरुन त्यांच्यावर राहुल गांधी यांच्यावर टीका करण्यात येत आहे. त्यांनी जे टि- शर्ट घातले होते. त्यावर प्रतिक्रिया येत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेनं मात्र ‘भारत जोडो’ यात्रेचे समर्थन करत भाजापावर जोरदार निशाणा लावला आहे. “राहुल गांधी व त्यांचा काँग्रेस पक्ष त्यांचे काम करीत आहे. ‘भारत जोडो’ ही एक चांगली संकल्पना आहे. भारतात कुठे काही मतभेद असतील, मने दुभंगली असतील, कुठे फुटीरतेची बिजे पसरली असतील तर त्यास जोडण्याची जिद्द घेऊन राहुल गांधी बाहेर पडले आहेत. देशभरात मैलोन् मैल ते चालणार आहेत. लोकांशी संवाद साधणार आहेत. याचे स्वागतच व्हायला हवे. पण भारतीय जनता पक्षाने राहुल यांच्या ‘टी शर्ट’ची किंमत जाहीर केली. मग भारतीय जनता पक्षाचे लोक गांधीजींप्रमाणे फक्त पंचा नेसून उघडे फिरून राजकारण करतात काय? मंत्रिमंडळात रोज चरख्यावर बसून सूत कताई करून त्याची वस्त्र शिवून हे लोक अंग झाकतात काय? की प्रखर हिंदुत्ववादी वगैरे असल्याने ऋषीमुनींप्रमाणे फक्त वल्कले नेसून मंत्रालयात अथवा पक्ष कार्यालयात जातात?” असे शिवसेनेचा अग्रलेख सामनातून म्हटले आहे.

“‘भारत जोडो’ यात्रेस लोकांची गर्दी होत आहे. राहुल गांधी हे प्रत्येक मुक्कामावर फटकेबाजी करीत आहेत. त्यास उत्तर द्यायला हरकत नाही. पण राहुल गांधी सत्य तेच बोलत आहेत. देश आतापर्यंत सर्वात अधिक आर्थिक संकटात आहे. देशात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढत असून शेतकरी, मजूर आणि छोटे-मध्यम उद्योग अडचणीत आल्याची टीका राहुल गांधी करतात व ‘भारत जोडो’ यात्रा अशा भूमिका घेऊन पुढे सरकत आहे. राहुल गांधी यांनी मांडलेल्या राष्ट्रीय प्रश्नांवर खुलासा करायचे सोडून ते कोणते कपडे घालतात, काय खातात वगैरे पांचट विषय भाजपाकडून समोर आणले जात आहेत. म्हणजेच राहुल यांनी विचारलेल्या प्रश्नांत ताकद आहे व भाजपावाल्यांची तोंडे बंद पडली आहेत,” असे शिवसेनेनं म्हटले आहे.

देशातील श्रीमंतांतही वैफल्य आहे. कारण भाजपाच्या अंतस्थ गोटातील मोजक्या लोकांनाच पैसे कमविण्याची मुभा आहे. इतरांनी कमवले तर ते ‘ईडी’चे बळी ठरतील. गरीबांचे तर विचारू नका. ते गरीबच होत आहेत. त्यांच्यासाठी ‘हिंदू विरुद्ध मुसलमान’ असा नफरती पुलाव आहे. राहुल गांधींची ‘भारत जोडो’ पदयात्रा हा नफरती माहोल दुरुस्त करून भारतात स्वच्छ, ऐक्याचा माहोल निर्माण व्हावा यासाठीच आहे. त्यांनी महागडे टी शर्ट घातले काय किंवा ते उघडे फिरले काय, फरक पडत नाही. राहुलवरील टीका भाजपास मात्र उघडे पाडीत आहे. असा हल्लबोल सामनातून भाजपावर करण्यात आला आहे.

यासोबतच “राहुल गांधी यांच्या कन्याकुमारी ते कश्मीर अशा ‘भारत जोडो’ यात्रेने भाजपाची पोटदुखी वाढू लागली आहे. डोकेदुखी नैसर्गिक आहे. राजकीय पोटदुखी ही एक प्रकारच्या विकृत मानसिकतेतून जन्मास येते. पोटात व डोक्यात वळवळणारे किडे तोंडातून म्हणजे शब्दांतून बाहेर पडतात. भाजपा प्रवक्त्यांनी असे किडे तोंडावाटे सोडायला सुरुवात केली आहे. राहुल गांधी हे ‘भारत जोडो’ पदयात्रेत जे ‘टी शर्ट’ वापरत आहेत त्याची किंमत ४१ हजार रुपये असल्याची माहिती भाजपा प्रवक्त्यांनी जाहीर केली. या अशा वक्तव्यांनी काय साध्य होणार?” व “आता राहुल गांधींच्या ‘टी शर्ट’ची किंमत जाहीर करताच जयराम रमेश यांनी पंतप्रधान मोदी यांचा दहा लाखांचा सूट व सव्वा लाखाचा चष्मा काढला. आणखी बरेच काही बाहेर निघेल. भारतीय जनता पक्षाने राजकारण कोणत्या पातळीवर नेऊन ठेवले आहे?” असा सवाल शिवसेनेने विचारला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : विधानभवन परिसरात प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक

Car Accident CCTV Footage : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्यानं 4-5 जणांना उडवलं

Ramdas Kadam On Thackeray Bandhu: राजकीय भूकंपाची शक्यता?; राज-उद्धव एकत्र येण्याच्या पार्श्वभूमीवर रामदास कदम यांचे खळबळजनक आरोप

Donald Trump : ट्रम्प यांचा मोठा विजय! ‘वन बिग ब्युटीफुल बिल’ अमेरिकन सिनेटमध्ये मंजूर