हवामान बदलांचा परिणाम म्हणून जगभरात उष्णतेच्या लाटांची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईत उन्हाने अंगाची काहिली झाली आहे. उकाडा आणि उन्हाचे चटके यांमुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. मागील काही दिवस मुंबईकरांना उन्हाचा प्रचंड त्रास झाला. मार्च ते मे या तीन महिन्यांत देशभरात तापमान सरासरीपेक्षा जास्त नोंदवली गेली आहे.
तर महाराष्ट्रासह दक्षिणेतील राज्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे यंदा उन्हाळ्याची तीव्रता जास्त जाणवणार आहे. अनेक जिह्यांतील तापमान 40 अंशांच्या वर गेले आहे. मुंबईमधील उपनगरांमध्ये हवेतील आर्द्रतेचे प्रमाण 90 टक्क्यांच्या घरात गेल्याने मुंबईकरांवर सूर्य आग ओकत असल्याची स्थिती निर्माण होत आहे.
सांताक्रुझमध्ये तापमानात 2 अंशांची वाढ झाली असून उष्णतेचा पारा 24 अंशांवर गेला आहे. पुढील आठवडाभर मुंबईचे तापमान सरासरी पातळीवर राहील. मात्र हवेतील आर्द्रतेचे प्रमाण अधिक राहिल्याने मुंबईकरांनच्या शरीरातून घामाच्या धारा वाहणार आहेत. आठवडाभर 33 ते 34 अंशांच्या आसपास कमाल तापमान नोंद होणार असल्याचे तर्क हवामान खात्याच्या अंदाजानुसार लावण्यात येत आहे.