Sanjay Raut On Eknath Shinde : शिवसेना ठाकरे खासदार संजय राऊतांनी केलेल्या त्या टीकेमुळे सध्या राजकरण चांगलेच तापले आहे. आनंद दिघेंबाबत आणि शिंदे गटातील आमदार यांच्यातील आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र झाले आहे. आनंद दिघेंबाबत केलेल्या वक्तव्यामुळे ठाकरेंच्या बाजूने बोलणारे राऊत यांच्यावर शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे यांनी थेट धमकी दिली. "संजय राऊतांनी सांभाळून बोलावं, नाहीतर घरात घुसून मारू" अशा शब्दांत मोरेंनी आक्रमक भाष्य केलं. त्यांच्या या वक्तव्यावर आता राऊतांनी मोरेंना प्रत्युत्तर दिले.
राऊत म्हणाले की, "हे जे बोलत आहेत त्यांना आनंद दिघे खऱ्या अर्थाने माहितच नाही. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर चित्रपट काढला म्हणून ते आनंद दिघे समजले, असं मुळीच नाही. त्या सिनेमातील बहुतेक गोष्टी खोट्या आणि फसव्या आहेत. आम्ही गद्दारांच्या धमक्या याआधीही खूप पाहिल्या आहेत. आता ते जर आमच्यावर चालून येत असतीलतर त्यांना योग्य उत्तर द्यावं लागेलच. कोण आहे हा राजेश मोरे? त्याला येऊ दे, आम्हाला काहीच हरकत नाही" म्हणत राऊतांनी थेट आव्हान दिलं.
फक्त मोरे यांनाच नाही तर मंत्री प्रताप सरनाईक यांनाही राऊतांनी चांगलंच सुनावलं आहे. नुकतंच सरनाईक यांनी विधान केलं होतं की, "राजन विचारे यांनी त्याग केला नसता, तर एकनाथ शिंदे पुढे आलेच नसते. यावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले, "प्रताप सरनाईक नावाच्या धोंड्याला शेंदूर कोणी फासला होतं? उद्धव ठाकरे यांनीच त्यांना पुढे आणलं. सरनाईक आणि शिंदे यांचं महाराष्ट्रासाठी काय शौर्य आहे? त्यांनी मराठी माणसासाठी नेमकं काय काम केलं आहे? ईडीच्या धाडी पडल्या तेव्हा ते पळून गेले होते. मग अशा लोकांनी राजन विचारे किंवा इतर निष्ठावंत शिवसैनिकांबद्दल बोलूच नये.
राऊतांनी पुढे स्पष्ट केलं की, "राजन विचारे हे शिवसेनेशी सुरुवातीपासून निष्ठावंत आहेत. तर सरनाईक हे अनेक पक्ष फिरून शेवटी शिवसेनेतच आले आणि आमदार झाले. मंत्रीपद मिळवण्यासाठी त्यांनी बेईमानी केली. त्यांचं खरं योगदान काहीच नाही. प्रत्यक्षात, राजन विचारे यांनी त्याग केला नसता, तर आज एकनाथ शिंदे नावाचं व्यक्तिमत्त्व पुढे आलंच नसतं."