Kandivali Crime News : कांदिवलीच्या एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणाऱ्या गुजराती अभिनेत्रींच्या मुलाने 57व्या मजल्यावरून उडी घेत स्वतःचे जीवन संपवले. अवघ्या 14 वर्षाच्या या मुलाने असे टोकाचे पाऊल उचलल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. एकुलता एक मुलाने आपला जीव गमावल्यामुळे अभिनेत्रीवर आणि तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
कांदिवली परिसरात 'सी ब्रूक' इमारतीमध्ये प्रसिद्ध गुजराती मालिकेची अभिनेत्री तिच्या कुटुंबासह त्या इमारतीच्या 57 व्या मजल्यावर राहत होती. काल संध्याकाळच्या वेळेस त्या अभिनेत्रीने आपल्या मुलाला ट्युशन क्लासला जाण्यास सांगितले. त्या मुलाने ट्युशनला जाण्यास नकार दिला. यामुळे आई आणि मुलगा यांच्यात बाचाबाची सुरु झाली त्याचे रूपांतर भांडणात झाले. यामुळे त्या 14 वर्षाच्या मुलाला प्रचंड राग आला. त्याला ट्युशनला जाण्यास त्याची आई प्रवृत्त करत होती मात्र त्याला तसे करायचे नव्हते. हा राग मनाशी धरून त्याने मागचा पुढचा कोणताही विचार न करता त्याच्या राहत्या घरातुन तब्बल 57व्या मजल्यावरून उडी मारत त्याने त्याचे जीवन संपवले. या घटनेने अभिनेत्रींचे संपूर्ण कुटुंब हादरले असून त्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. दरम्यान त्या अभिनेत्रीचा हा एकुलता एक मुलगा असल्याने या घटनेमुळे त्या अभिनेत्रीला मोठा धक्का बसला आहे.
ही घटना घडल्यानंतर तात्काळ पोलिसांना बोलावण्यात आले. पंचनामा केल्यानंतर मुलाचे शव पोस्टमार्टम साठी पाठवण्यात आले आहे. मुलाने नेमके कोणत्या कारणावरून हे टोकाचे पाऊल उचलले, याचा पोलीस कसून शोध घेत आहेत. इमारतीतील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. सध्या पोलिसांनी या प्रकरणात आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.