Ladaki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना मुंबई बँकेकडून 0% व्याजदराने कर्ज, महायुतीतील नेत्याने स्पष्ट केली महत्त्वाची माहिती
महिलांच्या सक्षमीकरणासाठी मुंबई बँकेने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. "लाडकी बहीण" योजनेअंतर्गत आता महिलांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज दिले जाणार आहे. या उपक्रमामुळे महिला उद्योजक व स्वयंरोजगार उपक्रम सुरू करणाऱ्या महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबई बँकेने जाहीर केलेल्या या योजनेत महिलांना एक लाख रुपयांपर्यंतचं बिनव्याजी कर्ज दिलं जाणार आहे. उद्योगधंदा सुरू करण्यासाठी किंवा चालविण्यासाठी महिलांना या योजनेतून थेट आर्थिक हातभार मिळणार आहे.
या कार्यक्रमात बँकेकडून क्यूआर कोड सुविधेचाही शुभारंभ करण्यात आला. डिजिटल व्यवहार अधिक सुलभ, सुरक्षित आणि पारदर्शक करण्यासाठी ही सुविधा सुरू करण्यात आली असून, महिलांना व्यवहार करताना याचा थेट फायदा होणार आहे. एका कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट व्हिडिओ कॉलद्वारे "लाडक्या बहिणींशी" संवाद साधला. त्यांनी महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेचं स्वागत केलं.
मुंबई बँकेच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली की या लाडक्या बहिणींना आम्ही एक लाख रुपयांचं बिनव्याजी कर्ज देतो, मात्र या संदर्भात राज्यातील चार महामंडळांनी मुंबई बँकेशी एमओयू करावा. मुख्यमंत्र्यांनी तत्काळ बैठक बोलावून निर्णय घेतला की, या चारही महामंडळांकडून व्याजाचा परतावा बँकेला दिला जाईल. तसेच इतर योजना ज्या राबवल्या जात आहेत त्यासाठीही परताव्याची तरतूद करण्यात आली.
या चार महामंडळांपैकी एमटीडीसीची "आई" योजना विशेषत्वाने पुढे आली आहे. या योजनेअंतर्गत शेकडो महिलांना थेट एक लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळालं आहे. या कर्जामुळे महिलांना व्यवसाय सुरू ठेवताना किंवा वाढवताना मोठा दिलासा मिळणार आहे. बाजारपेठेत स्पर्धा करताना व्याजदराचा बोजा महिलांसाठी नेहमीच अडथळा ठरतो. परंतु या नव्या योजनेमुळे महिलांना व्याजाशिवाय आर्थिक मदत मिळाल्याने त्यांच्या उद्योग-व्यवसायाला चालना मिळेल आणि सक्षमीकरणाच्या प्रक्रियेत मोठं पाऊल टाकलं जाईल. ही माहिती प्रवीण दरेकर यांनी दिली.