1985 सालची मुंबई फारशी गजबजलेली नसायची. मुंबईत राहणारा बेघर मुंबईकर म्हणजेच मुंबईतला असा व्यक्ती ज्याच्याकडे स्वत:चे घर नाही. तो मुंबईच्या फुटपाथवरच रात्र काढायचा आणि त्याच्या याच गोष्टीचा फायदा घेऊन रात्रीच्या अंधारात तो मुंबईतील बेघर लोकांना आपलं सावज बनवायचा. त्याच सिरीयल किलरला आज आपण ‘स्टोनमॅन’ या नावाने ओळखतो. या स्टोनमॅनने 80 च्या दशकात सायन ते किंग सर्कल परिसरात एकूण 12 हत्या घडवून आणल्या. त्यामुळे मुंबईत त्या काळी या स्टोनमॅनची दहशत पसरली होती.
1985 च्या रात्री मुंबईतील सायन लगतच्या परिसरात सर्वत्र अंधार, शुकशुकाट पसरलेला असताना रात किड्यांची किरकिर मात्र सर्वदूर ऐकू येत होती. त्यावेळी रात्रीच्या भयावह वातावरणात रस्त्याच्या कडेला एक बेघर व्यक्ती शांतपणे झोपली होती. दिवसभर काम करुन थकलेला असल्याने त्याला गाढ झोप लागली होती. त्याचवेळी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन एक माणूस मात्र त्या व्यक्तीकडे एकटक पाहत होता आणि हळू दबक्या पावलाने तो त्या व्यक्तीकडे जातो आणि तो व्यक्ती जमिनीवर पडलेला एक मोठा दगड उचलण्याचा प्रयत्नही करतो. त्या दगडाचे वजन जास्त असल्याने त्याला तो दगड उचलण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते. रस्त्याच्या कडेला झोपलेल्या माणसाला मात्र कल्पना नव्हती की त्याच्या आयुष्यातील ही शेवटची रात्र आहे. बघता बघता हातात दगड घेतलेला तो व्यक्ती त्या माणसाजवळ येऊन उभा राहतो आणि आपली संपूर्ण शक्ती एकवटून कुठलाच विचार न करता हातातला दगड तो त्या खाली झोपलेल्या माणसाच्या डोक्यात टाकतो. एका क्षणात सर्वत्र निरव शांतता पसरते आणि काही घडलेच नाही असे दाखवत तो माणूस तिथून निघून जातो.
सायनमध्ये झालेल्या या हत्येनंतर काही तासांत पोलीस घटनास्थळी पोहचतात आणि तपास कार्याला सुरुवात करतात. मात्र मृत व्यक्ती कोण आहे. याचा शोध घेणं पोलिसांसाठी फारच आव्हानात्मक होतं. पोलिसांना मृत व्यक्तीची ओळख पटवणं अवघड होतं. मृत व्यक्ती कुठून आली, तीचं कुटुंब याची माहिती देखिल पोलिसांना मिळत नव्हती. घटनास्थळी रक्ताने बरबटलेल्या दगडाशिवाय दुसरी कुठलीच महत्वाची वस्तू पोलिसांना सापडली नाही. म्हणून या हत्येनंतर काही दिवसांतच पोलिसांनी पुराव्यांअभावे या हत्येचा तपास बंद केला. त्यामुळे हत्येशी जोडला गेलेला एक प्रश्न कायम अनुत्तरीत राहिला. तो प्रश्न म्हणजे मारेकरी कोण होता?
त्या मृतदेहाला पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आलं. पोस्टमार्टम रिपोर्टनुसार डोक्यात जबर आघात झाल्याने त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. अशातच पोलिसांना सायनमध्ये असाच एक मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. तेव्हा पोलिसांच्या लक्षात आलं की अगोदरच्या हत्येचा देखिल घटनाक्रम तसाच होता. रस्त्यावर राहणाऱ्या एका माणसाची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली होती. या मृतदेहाची देखिल ओळख पटणे फार कठिण होते. त्याची ओळख सांगणारे कोणते कागदपत्र देखिल नव्हते.
काही महिन्यानंतर किंग्ज सर्कलच्या परिसरात एका फुटपाथवर अशीच हत्या केलेला मृतदेह आढळला. या ही माणसाची हत्या डोक्यात दगड घालून करण्यात आली होती. हा मृत व्यक्तीसुदधा रस्त्यावर राहणारा असल्याने त्याची ओळख पटणेही कठीण होते. पोलिसांना ठोस पुरावे सापडत नसल्याने पोलिसांनी या ही घटनेला स्थगिती दिली. मात्र तो मारेकरी मोकाट फिरत होता आणि आता तो आणखी एका सावजाच्या शोधात होता. अशातच मुंबईत आणखी 3 हत्या झाल्या. या तीनही हत्या डोक्यात दगड घालून करण्यात आल्या होत्या. डोकं दगड्याने ठेचलं असल्याने पोलिसांना ओळख पटणे यावेळीही अशक्य होते. अशाच हत्या करण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या 6वर जाऊन पोहचली. आता मात्र हा मारेकरी मोकाट फिरत असल्याने सर्वत्र खळबळ माजली. पोलिसांनी त्यांच्या तपासकार्याचा वेग वाढवला. पोलिसांनी सर्वात आधी हा मारेकरी कोण आहे आणि या हत्या तो का करतोय हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला. यावरुन पोलिसांनी असा अंदाज बांधला की, ही एक व्यक्ती नसून एखादी टोळी असावी. कारण 30 किलो वजनाचा दगड उचलून हत्या करणं हे एका माणसाचं काम नव्हते.
अशातच मुंबईत एका ठिकाणी बेघर माणून राहत होता. हा माणूस दिवसा हॉटेलमध्ये काम करायचा आणि रात्री रस्त्यावर जागा मिळेल तिथे झोपायचा. एका रात्री तो व्यक्ती कठड्यावर शांतपणे झोपला होता. त्यावेळी तो मारेकरी त्याच्यावर नजर ठेऊन होता. त्यानंतर मारेकरी त्याच्या शेजारी असलेला एक मोठा दगड त्या व्यक्तीच्या डोक्यात घालण्यासाठी उचलतो इतक्यात झोपलेल्या त्या व्यक्तीला जाग येते आणि भितीने तो व्यक्ती तिथून पळून जातो. मुंबईत घडलेल्या या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली मात्र अंधार असल्यामुळे त्या व्यक्तीला मारेकऱ्याचा चेहरा नीट पाहता आला नव्हता. मुंबईत झालेल्या त्या 6 हत्यांनंतर आता दीड वर्ष उलटून गेली होती. 1987 नंतर पुन्हा मुंबईत हत्या सत्राला सुरूवात झाली. 1985 ते 1988 या तीन वर्षांदरम्यान मुंबईत एकूण 12 हत्या झाल्या. या बाराही हत्या एकाच प्रकारे करण्यात आलेल्या होत्या. सर्व संशयित गुन्हेगारांची चौकशी करण्यात आली. रात्रीचे राऊंडअप वाढवले. रस्त्यावर झोपणाऱ्यांना सावध करण्यात आले. पोलिसांचा तपास सुरुच होता. 1988 नंतर मुंबईत होणाऱ्या हत्या थांबल्या, पण 1989मध्ये कोलकतामध्ये एका मागून एक हत्या होऊ लागल्या. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या सर्व हत्या मुंबईतील हत्यांशी फारच साम्य दर्शवणाऱ्या होत्या. कोलकत्यात सुध्दा रस्त्यावर राहणाऱ्या बेघर लोकांची डोक्यात अवजड दगड घालून हत्या करण्यात आली होती. साल 1989मध्ये फक्त सहा महिन्यांच्या कालावधीत कोलकत्यात एकूण 13 जणांची हत्या करण्यात आली. मुंबई आणि कोलकतामध्ये हत्या करणाऱ्या रहस्यमय मारेकऱ्याचा एकमेकांशी काहीतरी संबंध असल्याचं म्हटलं जाऊ लागलं.
वृत्तपत्रांच्या शीर्षकांतून तत्कालीन मीडियाने या रहस्यमय मारेकऱ्याला त्या वेळी “स्टोनमॅन” असं नाव दिलं होतं. या रहस्यमय मारेकऱ्याला सर्व जण ‘स्टोनमॅन’ या नावानेच ओळखू लागलेत. स्टोनमॅनचे हे गूढ काळाच्या ओघात मागे राहिले.