समाजातील अनिष्ठ रूढी परंपरांना मूठमाती देण्यासाठी कोल्हापूरातील राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या काळात विविध कृती कार्यक्रम हाती घेऊन समाज सुधारणा घडवून आणल्या. त्यापैकीच एक म्हणजे शाहू महाराजांनी गंगाराम कांबळे यांना सुरू करून दिलेले 'सत्यसुधारक हॉटेल'. ज्या काळात रूढी, परंपरा,जातपात पाळल्या जात त्या काळात राजर्षी शाहू महाराजांनी महार समाजातील व्यक्तीला हॉटेल सुरू करून द्यायचा ऐतिहासिक निर्णय घेतला.
कोल्हापुरातल्या बावडा बंगल्याच्या आवारात सर्व नोकरचाकरांची कामं सुरू होती. त्यात गंगाराम कांबळे हे सरकारी पागेतील मोतद्दारही होते. तेथील काही उच्चभ्रु समाजातील कर्मचाऱ्यांनी गंगारामला मारहान केली कारण होतं, त्यानं पाणी पिण्यासाठी उच्चवर्णीय समाजासाठी असलेल्या हौदाला स्पर्श केल्याचं.
खरं तरं १९१९ ला शाहू महाराजांनी सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यता न पाळण्याचा जाहीर हुकूम काढला होता. महाराजांचं या संदर्भातलं धोरण माहीत असूनही त्यांच्या संस्थानात ही घटना घडली होती. हे सर्व घडत असताना महाराज काही कामानिमित्त दिल्लीला गेले होते.
दिल्लीहून परत येताच सर्व प्रकार गंगारामने महाराजांना सांगितला आणि गंगाराम समोर त्या कर्मचाऱ्यांना शिक्षा झाली. शाहु महाराजांनी गंगारामला जवळ घऊन म्हणाले "जा, गंगाराम तुला नोकरी माफ केली. तू कोणताही स्वतंत्र धंदा कर. लागेल ती मदत माझ्याकडे माग."
पुढे काही दिवसांतच गंगाराम कांबळे यांनी शाहू महाराजांच्या प्रोत्साहनानं कोल्हापुरातील भाऊसिंगजी रोडवर 'सत्यसुधारक' हॉटेल सुरू केलं.
गंगाराम यांना हॉटेल काढून देण्याचाच फक्त त्यांनी निर्णय घेतला नाही. एका अस्पृश्य समाजातील माणसाचे हॉटेल चालावे त्यांनी एक नामी शक्कल लढवली. इतिहासात आजही ती सुवर्णक्षरांनी कोरली गेली आहे. सकाळच्या वेळेला शाहू महाराज घोडागाडीतून फेरफटका मारत असत. यावेळी शाहू महाराज गंगाराम कांबळे यांच्या हॉटेलसमोर थांबून भारदस्त आवाजात घोडागाडीमध्ये बसलेल्या सर्वांना गंगाराम यांना चहा आणायला सांगत. स्वत: शाहू महाराज गंगारामच्या हातचा चहा घेतात म्हटल्यावर घोडागाडीतील सर्वांना चहा पिणे भाग पडे.
शाहू महाराज एवढ्यावरच थांबले नाहीत त्यांनी यानिमित्ताने समाजातील जातीपातीला मूठमाती मिळावी यासाठी यानिमित्ताने प्रयत्न केले. शाहू महाराजांची सही कुणाला हवी असेल तर गंगाराम कांबळे यांच्या सत्यसुधारक हॉटेलमध्येच या म्हणून सांगितले जात असे. यामुळे गंगाराम यांच्या हॉटेलवर नागरिकांची मोठी गर्दी होऊ लागली. यावेळी शाहू महाराज येणार्या प्रत्येकाला गंगाराम कांबळे यांच्या हातचा चहा पाजून मगच सही करत.
शाहू महाराजांनी गंगाराम कांबळे यांच्या जीवनात क्रांती घडवून आणली. हेच गंगाराम कांबळे पुढे अस्पृश्य समाजाचे पुढारी बनले. अस्पश्योध्दाराच्या काळात महाराजांचे ते कार्यकर्ते झाले. शाहू महाराजांच्या निधनानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्पृश्य मुक्तीच्या लढ्यात कोल्हापूर संस्थानात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निष्ठवान कार्यकर्ते म्हणून कार्यरत राहिले.
संदर्भ भाई- श्री. शाहू महाराज यांच्या आठवणी ,लेखक- माधवराव बागल1950