जागतिक दूरदर्शन दिन दरवर्षी 21 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. माहिती, ज्ञान, मनोरंजन आणि संवाद ही त्याची चतुसूत्री आहे. म्हणूनच जागतिक दूरदर्शन दिनाची सुरुवात संयुक्त राष्ट्रांनी 1996 मध्ये केली. त्याच वर्षी, संयुक्त राष्ट्रांनी पहिल्या जागतिक दूरदर्शन मंचाचे आयोजनही केले. या फोरममध्ये जगभरातील मीडिया व्यक्तिमत्त्वांनी टेलिव्हिजनच्या वाढत्या महत्त्वावर चर्चा केली. तेव्हापासून, संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने दरवर्षी 21 नोव्हेंबर हा जागतिक दूरदर्शन दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. माहितीच्या प्रसारामध्ये टेलिव्हिजनची भूमिका आणि जागतिक स्तरावर निर्णय घेण्याच्या प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याची त्याची क्षमता अधोरेखीत करण्यासाठीही हा दिवस साजरा होतो.
आता बाजारात 4k, HD, LCD, LED असे अनेकप्रकारचे टिव्ही आल्याने आत्ताच्या पोरांना त्याचं विशेष कौतुक वाटत नाही. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आल्याने तर ही उत्सुकता शुन्यच झाली आहे. पण 1970-80 दरम्यान पुर्ण गल्लीत एक टिव्हिचा काळा डब्बा असला तरी भारी काहीतरी वाटायचं. खाटेवर बसलेले बाबा जे सांगतील तेच चॅनल सर्वांना बघाव लागणार. कधी रामायण कधी महाभारत तर कधी अमिताभ यांचा एखादा जुना मुव्ही... आज आंतरराष्ट्रीय टेलीव्हीजन दिनानिमीत्त भारतात टिव्ही कसा आणि कधी आला ते बघू.
युनायटेड नेशन्सने 17 डिसेंबर 1996 रोजी एक समिती तयार केली. त्यांनी समाजाच्या मनात दूरगामी परिणाम करणारे तसेच आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पैलूंशी संबंधित माहितीच्या जागतिक देवाणघेवाण करणारे माध्यम म्हणून टेलिव्हिजनचे महत्त्व ओळखले. त्यासाठीच समितीने 21 नोव्हेंबर हा जागतिक दूरचित्रवाणी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.