Vikhroli Landslide : विक्रोळीत दरड कोसळून दोघांचा मृत्यू, 4 जण जखमी
( Vikhroli Landslide) मुंबईत शुक्रवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विक्रोळीच्या पार्कसाईट भागात शनिवारी पहाटे दरड कोसळली. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत.
पार्कसाईट परिसर डोंगराळ असून येथे मोठ्या प्रमाणावर झोपडपट्ट्या आहेत. प्रत्येक पावसाळ्यात दरड कोसळण्याचा धोका व्यक्त केला जातो. यंदाही पालिकेने आगाऊ इशारा दिला होता आणि काही घरे रिकामी करण्यास सांगितले होते. मात्र, काही कुटुंबे तिथेच राहत होती.
शनिवारी पहाटे झालेल्या दुर्घटनेत मिश्रा कुटुंबीयांचे घर दरडीखाली गाडले गेले. प्राथमिक माहितीनुसार, सुरेश मिश्रा (50) आणि त्यांची मुलगी शालू मिश्रा (19) यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्या पत्नी आरती मिश्रा (45) आणि मुलगा ऋतुराज (20) यांच्यासह आणखी दोन जण जखमी असून त्यांच्यावर घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरड कोसळल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि महानगरपालिकेचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य सुरू केले. ढिगाऱ्याखालून नागरिकांना बाहेर काढल्यानंतर तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले.
महानगरपालिकेकडून दरडग्रस्त भागातील उर्वरित नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले जात आहे. हवामान खात्याने आज मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून दिवसभर जोरदार पाऊस सुरू राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे आणखी दुर्घटना टाळण्यासाठी डोंगरपट्ट्यांमध्ये सतर्कता वाढवण्यात आली आहे.नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.