27 मार्च हा दिवस दरवर्षी 'जागतिक रंगभूमी दिन' (World Theatre Day 2022) म्हणून साजरा केला जातो. 1961 मध्ये 'युनेस्को'च्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिटय़ूटने या दिवसाची सुरुवात केली होती. पहिला जागतिक रंगभूमी दिन 1962 मध्ये साजरा झाला. या विशेष दिवशी जगभरातील नाट्य जगतातील महत्त्वाची एक व्यक्ती संदेश देते. हा युनेस्कोच्या जागतिक रंगभूमी दिनाचा महत्त्वाचा भाग आहे. 1962 साली ज्यो कॉक्चू (Joe Cochchu) यांनी पहिल्यांदा हा संदेश देण्याचा पहिला मान मिळवला होता. तर 2002 मध्ये प्रसिद्ध भारतीय नाट्य कलाकार गिरीश कर्नाड (Girish Karnad) यांना ही संधी मिळाली होती.
नाटक हे मराठी माणसाच्या मनावर सर्वकाळ अधिराज्य गाजवणारं माध्यम. आज आपण सिनेमा, टीव्ही, ओटीटी असं सर्व सुविधांयुक्त आयुष्य जगत असलो तरी नाटक बघणारा, त्याला पसंती देणारा एक मोठा वर्ग आहे. आपल्या आवडत्या कलाकाराला प्रत्यक्ष अभिनय करताना बघणं आणि त्याला त्याच्या कामाची दाद देणं हे मराठी प्रेक्षकांना मनापासून आवडतं. म्हणून हे माध्यम अधिकाधिक पारदर्शक आहे. विष्णुदास भावे यांच्या 'सीता स्वयंवर' हे पहिलं नाटक ज्याने रंगमंचावर पाऊल ठेवलं अन् मराठी रंगभूमीला स्वत:ची ओळख मिळाली. 1843 मध्ये सांगलीत मराठीतल्या या पहिल्या संवाद आणि संगीत नाटकाचा प्रयोग झाला.
व्यक्ती आणि त्याची संवाद साधण्याची कला यातून सामुदायिक कलाविष्काराला इंग्रजीत `थिएटर' आणि मराठीत आपण 'रंगभूमी' हा शब्द त्याला वापरतो. रंगभूमी, नाट्यसंहिता, नाट्यदिग्दर्शक, रंगभूषा, वेषभूषा, रंगमंदिर, रंगमंच या सर्व गोष्टी रंगभूमीशी निगडित आहेत. नाटक हे वेगवेगळ्या भाषांमधून सादर केले जाते. उद्या. ग्रीक, रोमन, ब्रिटीश, जर्मन, रशियन, अमेरिकन अशा वेगवेगळ्या भाषांमधून नाटकांचा हा प्रवाह चालत आलेला आहे. पूर्वी आजच्यासारखे रंगमंच नव्हते तेव्हा एका मैदानात रंगमंदिर उभारले जात असे.