मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) महत्त्वाकांक्षी ठाणे बोरिवली दुहेरी भुयारी मार्ग प्रकल्पासाठी केंद्रीय वन्यजीव मंडळाची परवानगी मिळाल्याने भूमिपूजनातील मोठा अडथळा दूर झाला आहे. त्यामुळे येत्या 19 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन होण्याची शक्यता आहे. ठाणे-बोरिवली प्रवास अतिवेगवान आणि सुखकर करण्यासाठी एमएमआरडीए ने 11.8 किमीचा ठाणे बोरिवली दुहेरी भुयारी मार्ग प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पासाठी 16, 600.40 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्याचे कंत्राट हैद्राबादस्थित मेघा इंजिनिअरिंग इन्फ्रास्ट्रक्वर्स ला देण्यात आले आहे. हा मार्ग संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून बांधला जाणार आहे. त्यात 10.25 किमीच्या दोन बोगद्यांचा समावेश आहे. प्रकल्पाचे भूमिपूजन करून जानेवारीपासून प्राथमिक कामाला सुरुवात करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन होते.