थोडक्यात
राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या जोरदार सरी
अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण
हवामान खात्याने डिसेंबरपर्यंत वर्तवला पावसाचा अंदाज
(Maharashtra Rain Update ) राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकऱ्यांच्या पीकांचे अतोनात नुकसान झालं आहे.
अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू आहे. पुणे, मुंबईसह, मराठवाडा आणि राज्यातील सर्व जिल्ह्यातील पावसाचा जोर कमी होणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र आता राज्यातला पाऊस डिसेंबरपर्यंत राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर कोकण , मध्य महाराष्ट्र , मराठवाडा, विदर्भ पावसाची शक्यता वर्तवली आहे.
बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून हे क्षेत्र ओडिशा ते आंध्रप्रदेशच्या दरम्यान किनारपट्टी ओलांडण्याचा अंदाज आहे. यामुळे विदर्भात गुरुवारपासून शनिवारपर्यंत पावसाची शक्यता आहे.
आतापर्यंत राज्यात 120 टक्के सरासरी पावसाची नोंद असून राज्यात सर्वाधिक पावसाची नोंद धाराशिवमध्ये झाली आहे.