Gautam Adani
Gautam AdaniAdmin

अदानी समुहाला झटका, आंध्रप्रदेश वीजखरेदीबाबत फेरविचार करणार?

अमेरिकेने केलेल्या आरोपानंतर अदानी समुहाच्या अडचणी वाढणार आहेत. केनियाने अदानी समुहासोबत होत असलेला करार रद्द केला. त्यानंतर आता देशांतर्गत पातळीवरही अदानी समुहाला फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

अमेरिकेच्या न्याय मंत्रालयाने उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर केलेल्या लाचखोरीच्या आरोपांनंतर त्याचे पडसाद आता पाहायला मिळत आहेत. केनिया सरकारने रद्द केलेल्या करारानंतर आता देशातही त्याचे पडसाद उमटताना पाहायला मिळत आहे. आंध्रप्रदेश सरकार अदानी समूहाबरोबर विद्युत खरेदी करार होणार आहे. मात्र, याबाबत आंध्रप्रदेश सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे अदानी समुहाच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहेत.

थोडक्यात

  • अदानींकडून वीजखरेदीबाबत आंध्रप्रदेश फेरविचार करणार?

  • लाचखोरीच्या आरोपांनंतर नायडू सरकारच्या हालचाली

  • अदानी समुहाबरोबर विद्युत खरेदी करार स्थगित करण्याची शक्यता

आंध्रप्रदेश सरकार अदानी समूहाबरोबर विद्युत खरेदी करार स्थगित करण्याची शक्यता असल्याची माहिती सरकारमधील दोन सूत्रांनी दिली आहे. यामुळे अदानी समूह अधिकच अडचणीत आल्याचे चित्र आहे. वीजपुरवठा करण्यासाठी अदानीसारख्या कंपन्यांना कंत्राट देण्याचे काम ‘एसईसीआय’कडून केले जाते. याअंतर्गत आंध्र प्रदेशला वीजपुरवठा पुढील वर्षात सुरू होणार आहे. मात्र, हा करार स्थगित करण्याचा निर्णय लवकरच जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास अमेरिकेच्या आरोपकर्त्यांनी अदानींवर ठेवलेल्या आरोपांनंतर कारवाई करणारे आंध्रप्रदेश हे भारतातील पहिले राज्य असेल.

अदानी समुहाने अमेरिकेने केलेले फसवणुकीचे आरोप फेटाळले

अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये अदानींवर फसवणुकीचा आरोप करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. सौरऊर्जेचे कंत्राट मिळवण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना 250 दशलक्ष डॉलर्सची लाच देण्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. गौतम अदानीसह 8 जणांवर अब्जावधी डॉलर्सची फसवणूक आणि लाच घेतल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. न्यूयॉर्कच्या फेडरल कोर्टाच्या सुनावणीत अदानींवर हा आरोप करण्यात आला आहे. या आरोपाचं खंडन करत अदानी समुहाकडून निवेदन जारी केलं आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com