भूपेंद्र पटेल यांनी घेतली गुजरातच्या मुख्यमंत्री पदाची शपथ
भाजपचे भूपेंद्र पटेल यांनी गुजरातच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडला. गुजरातच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेले भूपेंद्र पटेल 17 वे मुख्यमंत्री ठरले आहेत.
आज गांधीनगर येथील राजभवन येथे एका कार्यक्रमात भूपेंद्र पटेल यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर खट्टर, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.
विजय रुपाणी यांनी राजीनामा दिल्यानंतर नवीन मुख्यमंत्री कोण असणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर रविवारी भाजपनं गुजरातच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली. भूपेंद्र पटेल हे गुजरात विधिमंडळाचे नेते म्हणून निवडले गेल्याची माहिती केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राज्यातील बड्या नेत्यांवर मात करत अखेर भूपेंद्र पटेल यांनी राज्याचं मुख्यमंत्रीपद स्वत:कडे खेचून आणलं आहे. पहिल्यांदाच आमदार झालेले असताना आणि संसदीय कामकाजाचा फारसा अनुभव नसतानाही पटेल यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ टाकण्यात आली आहे.