Adani Group : अदानी ग्रुपकडून चिनी कंपनीला धक्का! 'तो' करार अचानक केला रद्द
एका आठवड्यापूर्वी अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज आणि चिनी कंपनी ड्रॅगनपास यांच्यात एक करार झाला होता. यानंतर अदानी एअरपोर्ट होल्डिंग्जने चिनी कंपनी ड्रॅगनपाससोबत केलेला करार रद्द करत असल्याचे जाहीर केलं असल्याचं स्वतः सांगितलं आहे. "मीडिया स्टेटमेंट 15 मे 2025 विमानतळ लाउंजमध्ये प्रवेश देणाऱ्या ड्रॅगनपासशी आमचा संबंध तात्काळ संपुष्टात आला आहे. ड्रॅगनपास ग्राहकांना आता अदानी-व्यवस्थापित विमानतळांवर लाउंजमध्ये प्रवेश मिळणार नाही. या बदलाचा विमानतळ लाउंज आणि इतर ग्राहकांच्या प्रवास अनुभवावर कोणताही परिणाम होणार नाही". असं कंपनीने स्पष्ट केलं आहे.
तसेच गुरुवारी नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोच्या निर्णयांतर्गत भारताने देखील तुर्की विमानतळ ग्राउंड हँडलिंग कंपनी सेलेबीची सुरक्षा मंजुरी रद्द केली. सेलेबी दिल्ली कार्गो टर्मिनल मॅनेजमेंट इंडिया प्रा. लि. लिमिटेड फ्रेट टर्मिनलचे कामकाज पाहत होते. तर सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस इंडिया प्रा. लिमिटेड दिल्ली विमानतळावर जमिनीच्या देखभालीची जबाबदारी पाहत होते. यादरम्यान कार्गो ऑपरेशन्ससाठी जबाबदार असलेल्या सेलेबी कंपन्यांसोबतचा करार औपचारिकपणे रद्द करत असल्याचं स्पष्ट मत दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडने एका निवेदनात मांडलं होत.
तसेच आता अदानीने ड्रॅगनपाससोबतचा करार रद्द केल्यामुळे ड्रॅगनपास असणाऱ्या सदस्यांना अदानी समूहाद्वारे व्यवस्थापन केलेल्या मुंबई, अहमदाबाद, लखनऊ, मंगळुरू, जयपूर, गुवाहाटी आणि तिरुवनंतपुरम या विमानतळांवर लाउंज प्रवेश मिळू शकणार नाही.