11th Admission Merit List : 11वी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर, विद्यार्थ्यांसाठी प्रवेश घेण्याची अंतिम मुदत जाणून घ्या...
राज्यातील दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. 11वी प्रवेशाच्या पहिल्या गुणवत्ता यादीची प्रतीक्षा अखेर संपली असून ही यादी शिक्षण संचालनालयाने वेळेपूर्वीच जाहीर केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. मूळ नियोजनानुसार ही गुणवत्ता यादी 30जून रोजी प्रसिद्ध होणार होती, मात्र ती यापूर्वीच अधिकृतपणे उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे 11 वी प्रवेशासाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवेशाची स्थिती वेळेआधीच कळणार आहे.
राज्यभरातून यंदा 12 लाख 71 हजार विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी केली होती. दीड महिना आधी म्हणजेच 13 मे रोजी दहावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थी व पालक 11वी प्रवेश प्रक्रियेची वाट पाहत होते. शासनाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की, पहिल्या यादीत ज्यांना कॉलेज मिळाले आहे, त्यांनी 30 जून ते 7 जुलै या कालावधीत संबंधित कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश निश्चित करावा. प्रवेश निश्चित न केल्यास पुढील फेरीनुसार नव्याने कॉलेज निवडावे लागेल.
कुठे पाहाल गुणवत्ता यादी?
विद्यार्थ्यांना https://mahafyjcadmissions.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपली गुणवत्ता यादी पाहता येईल. लॉगिन केल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या नावासमोरील कॉलेजची माहिती दिसेल. यंदा प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता आणि अचूकता राखण्यासाठी संगणक प्रणालीमध्ये आवश्यक सुधारणा करण्यात आल्या आहेत. यामुळे गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांची यादी अधिक योग्यरीत्या प्रसिद्ध होईल, असे शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे. प्रवेश यादी जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी विलंब न करता आपली यादी पाहावी आणि आवश्यक कागदपत्रांसह दिलेल्या वेळेत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी. प्रवेशासाठी दिलेली वेळ ही अंतिम असून नंतर कोणतीही तक्रार ग्राह्य धरली जाणार नाही, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.