Byju's Learning App : बायजूस लर्निंग अॅप गुगल प्ले स्टोअरवरून हटवले; काय आहे प्रकरण?
शैक्षणिक तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी बायजूसच्या मुख्य शिक्षण अॅपला गुगल प्ले स्टोअरवरून हटवण्यात आले आहे. अॅमेझॉन वेब सर्व्हिसेसकडे (AWS) थकलेल्या पेमेंटमुळे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती इंडस्ट्री सूत्रांनी दिली. मात्र, बायजूस ब्रँडअंतर्गत येणारी इतर अॅप्स, जसे की बायजूस प्रीमियम लर्निंग अॅप आणि एग्झाम प्रेप अॅप, अजूनही प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत. अॅपल युजर्ससाठी मूळ अॅप अद्याप अॅप स्टोअरवरून डाउनलोड करता येते. AWS कडून अॅपला मिळणाऱ्या सेवा थकित देयकांमुळे थांबवल्या गेल्या असून, सध्या बायजूसचा आर्थिक कारभार एक इन्सॉल्व्हन्सी रिझोल्यूशन प्रोफेशनल (IRP) पाहत आहे. तो कंपनीच्या सर्व आर्थिक बाबींचे व्यवस्थापन करत आहे.
बायजूस लर्निंग अॅपमध्ये इयत्ता 4 ते 12 पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी गणित, विज्ञान, आणि सामाजिक शास्त्राचा समावेश होता. तसेच जेईई, नीट आणि आयएएस परीक्षांच्या तयारीसाठी साहित्यही उपलब्ध होते. दरम्यान, कंपनीविरुद्ध नॅशनल कंपनी लॉ अपीलेट ट्रिब्युनल (NCLAT) कडून दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही कारवाई गुंतवणूकदारांच्या वतीने कर्जदार ट्रस्टी ग्लास ट्रस्ट यांच्या अपीलनंतर झाली आहे.
बायजूसची अमेरिकन उपकंपनी बायजूस अल्फा ने संस्थापक बायजू रवींद्रन, सहसंस्थापक दिव्या गोकुलनाथ आणि माजी कार्यकारी अनीता किशोर यांच्यावर 533 दशलक्ष डॉलर्सचे निधी चुकीच्या मार्गाने वळवल्याचा आरोप केला आहे. रवींद्रन यांनी या आरोपांना खोडून काढले असून, हे सर्व एक नियोजित कारस्थान असल्याचा दावा केला आहे. या सगळ्या अडचणी असूनही संस्थापकांनी कंपनी बंद करण्यास नकार दिला आहे आणि 'बायजूस 3.0' चा सुरु करण्याचे संकेत दिले आहेत.