India
Live update : देशभरात चक्काजाम आंदोलनाला सुरुवात
लोकशाही न्यूज नेटवर्क
नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी आज (शनिवार) देशभर 'चक्का जाम'ची हाक दिली आहे. राजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांना या आंदोलनातून वगळण्यात आले आहे. देशभरात राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्गांवर दुपारी 12 ते 3 या कालावधित आंदोलन केले जात आहे. संयुक्त किसान मोर्चाने याबद्दल शुक्रवारी माहिती दिली.
- पंजाब : शेतकऱ्यांनी अमृतसर-दिल्ली राष्ट्रीय महामार्गावर चक्का जाम केले. मोहालीमध्येही आंदोलन करण्यात आले.
- हरियाणा : शेतकऱ्यांनी शाहजहानपूर (राजस्थान-हरियाणा) सीमेजवळ राष्ट्रीय राजमार्गावर चक्का जाम केला.
- जम्मू-कश्मीर : शेतकरी संघटनांनी देशभर जम्मू-पठाणकोट हायवेवर चक्का जाम केला.
- बंगळुरू : येलहंका पोलीस ठाण्याबाहेर कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
- महाराष्ट्र : परभणीत सुकाणू समितीच्या वतीने परभणी-गंगाखेड मार्गावर पोखरणी फाटा येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी गंगाखेड मार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
- महाराष्ट्र : कोल्हापूर शहरातील दाभोलकर कॉर्नर परिसरात जोरदार घोषणाबाजी करत चक्काजाम आंदोलन करण्यात आले. आंदोलन करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेकापच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचाही समावेश आहे.
- महाराष्ट्र : वर्ध्यामध्ये नागपूर वर्धा मार्गावरील पवनार येथे रास्ता रोको करण्यात आला. अर्धा तास वाहतूक विस्कळीत झाली होती. आंदोलनात कार्यकर्त्यापेक्षा पोलिसांची संख्या जास्त होती.
- महाराष्ट्र : औरंगाबादच्या सिल्लोड येथे भाकपा व किसान सभेच्या वतीने रस्ता रोको करण्यात आला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी मोदी सरकार विरोधी जोरदार घोषणा दिल्या. भाकपाचे राष्ट्रीय नेते प्रा. राम बाहेती व युवा नेते सय्यद अनिस यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
- महाराष्ट्र : बुलडाणा येथील बुलडाणा – अकोला मार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चक्का जाम आंदोलन केले. यामुळे वाहनांच्या लागल्या लांबच लांब रांगा लागल्या.
- दिल्ली : कृषी कायद्यांविरोधात शहिदी पार्क येथे आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
- महाराष्ट्र : साताऱ्यात बॉम्बे रेस्टॉरंट पुलाखाली विविध संघटनांनी चक्काजाम आंदोलन केले.
- महाराष्ट्र : नाशिक जिल्ह्यातील मनमाडमध्ये किसान सभेच्या वतीने केंद्र शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत पुणे – इंदूर महामार्ग रोखुन धरला. त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
- तेलंगणा : हैदराबादलगतच्या महामार्गावर चक्काजाम करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी हटवले.
- महाराष्ट्र : दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी लातूर शहरामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने विविध ठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात आले.
- महाराष्ट्र : केंद्र सरकारने लागू केलेले तिनही कृषी कायदे रद्द करण्यात यावे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांच्या नेतृत्वाखाली नाशिकच्या निफाड येथील नाशिक – औरंगाबाद महामार्गावर चक्का जाम आंदोलन करण्यात आले.
- महाराष्ट्र : अमरावती येथील अमरावती – नागपूर राष्ट्रीय महामार्ग 6 वर रहाटगाव जवळ अखिल भारतीय किसान समन्वय समिती, वंचित बहुजन आघाडी, शेतकरी संघटना यासह अनेक संघटनांनी चक्का जाम आंदोलन केले. केंद्र सरकार विरोधी जोरदार घोषणाबाजी करत अर्धा तास राज्य महामार्ग 6 आंदोलकांनी अडवून धरला होता. त्यानंतर आंदोलकांना पोलिसांनी अटक केली. यावेळी दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या