काय बोलता ! केवळ साडेचार दिवसांचा आठवडा

काय बोलता ! केवळ साडेचार दिवसांचा आठवडा

Published by :
Published on

संयुक्त अरब अमिराती (यूएई)मध्ये पुढील वर्षापासून कर्मचाऱ्यांसाठी शनिवार-रविवार सुटीसह साडेचार दिवसांचा आठवडा असेल, असे तेथील सरकारने मंगळवारी जाहीर केले आहे. देशाची अर्थव्यवस्था जागतिक बाजारपेठेशी सुसंगत राहावी, या उद्देशाने हा बदल करण्यात आला आहे. सध्या यूएईमध्ये शुक्रवार आणि शनिवार अशी दोन दिवस सुटी असते. आता १ जानेवारी २०२२ पासून शुक्रवारी दुपारपासून सुटी सुरू होईल. त्यानंतर सोमवारीच कामावर जावे लागेल.

यूएईने गेल्या काही वर्षांपासून परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न चालविले आहेत. त्याचवेळी परदेशातील प्रशिक्षित आणि उच्चशिक्षित मनुष्यबळ देशात आणण्यासाठी पोषक वातावरण तयार केले जात आहे. आर्थिक आघाडीवर यूएईची स्पर्धा ही सौदी अरेबियाशी आहे. ती आता अधिक तीव्र बनली आहे.

नव्या धोरणानुसार सरकारी कार्यालयांतील कामकाजाचा आठवडा आता सोमवारी सुरू होऊन शुक्रवारी दुपारी दोन वाजता संपेल. त्यानंतर मुस्लिम समुदायाच्या प्रार्थना सुरू होतात. त्याआधी काम संपणे आवश्यक आहे. सुटीच्या या धोरणामुळे कर्मचाऱ्यांना त्यांचे काम आणि त्यांचे वैयक्तिक- सामाजिक जीवन यांच्यात चांगला ताळमेळ साधता येईल, असे सरकारने म्हटले आहे. अल धाबी राजधानीतील मुख्य धोरण अधिकारी मोहम्मद अली यासिन यांनी सांगितले की, यामुळे येथील व्यापारी- कंपन्यांना विकसित देशांतील आर्थिक संस्थांबरोबरच देवघेवीचे व्यवहार सुलभरित्या करणे शक्य होईल. यातून येथील पर्यटन क्षेत्रालाही मोठा लाभ होईल.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com