Tahawwur Rana : डोक्यात नक्की काय शिजतंय ? तहव्वुर राणाच्या 'या' तीन मागण्या
26/11 च्या मुंबई हल्ल्यातील सूत्रधारांपैकी एक असलेला राणा आता दिल्लीतील सीजीओ कॉम्प्लेक्स येथील एनआयए मुख्यालयातील उच्च सुरक्षा कक्षात आहे. मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या प्रमुख सूत्रधार तहव्वूर हुसेन राणा याचे अमेरिकेने भारताकडे प्रत्यार्पण केल्यानंतर राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआय) त्याचा ताबा घेतला आहे. दिल्लीतील विशेष एनआयए न्यायालयाने १८ दिवसांची कोठडी सुनावल्यानंतर 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यांच्या मालिकेतील कटाचा तपास करण्यासाठी राष्ट्रीय एनआयएने तहव्वूर हुसेन राणा याची सलग दुसऱ्या दिवशी चौकशी केली.
या चौकशी दरम्यान राणाने कुराण, पेन आणि कागदांची मागणी केल्याची माहिती समोर आली आहे.तहव्वुर राणा याला नवी दिल्लीतील सीजीओ कॉम्प्लेक्समधील एनआयएच्या मुख्य कार्यालयात अत्यंत सुरक्षित कक्षात ठेवण्यात आले आहे, जिथे सुरक्षा कर्मचारी चोवीस तास पहारा देत आहेत, असे वृत्त वृत्तसंस्था पीटीआयने अज्ञात सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.
मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वुर राणाला भारतात आणण्यात आले. या हल्ल्यातील एकमेव जीवंत दहशतवादी अजमल कसाबला ज्या प्रकारे फाशी दिली, त्याचप्रमाणे तहव्वुर राणालाही फाशी द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.