Sunita Williams : पृथ्वीवर परतल्यानंतर सुनीता विल्यम्सने भारताचे केले कौतुक, नव्या आव्हांनासाठीही सज्ज
भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स 9 महिन्यांनंतर पृथ्वीवर परतल्या. पृथ्वीवर परतल्यानंतर त्यांनी सोमवारी पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी त्यांच्या आंतराळ प्रवासातील अनुभवांबद्दल सांगितले आहे. सर्वप्रथम त्यांनी नासा, बोइंग, स्पेसएक्स आणि मिशनशी संबंधित असणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत. तसेच आम्ही पुन्हा एकदा नव्या आव्हांनासाठी सज्ज झालो आहोत. नव्या मिशनसाठी तयारी करतोय असं सुनिता म्हणाल्या.
सुनीता विल्यम्स यांनी व्यक्त केल्या भावना :
पृथ्वीवर परतल्यानंतर पतीला आणि पाळीव श्वानांना मिठी मारायची होती. घरी आल्यावर पहिली गोष्ट खाल्ली ते म्हणजे, एक चविष्ट ग्रील्ड चीज सँडविच.पृथ्वीवर परत आल्यापासून आम्ही तज्ज्ञांनी सुचविलेल्या प्रोटोकॉलचे पालन करत आहोत. आमची रिकव्हरीवर हळूहळू होत आहे, असे त्या म्हणाल्या.
चुकांमधून शिकलो :
आमचं मिशन पूर्ण करून परत यायला वेळ लागला, पण त्यावरून आम्ही योग्य धडा शिकलो आहोत. पुढल्या वेळेस काय करावं किंवा काय टाळावं हे आम्ही त्या चुकांमधून शिकलो. चुकांमधून योग्य तो धडा घ्यायचा आणि पुढे जायचं. या मिशनमधून आयुष्यभराचे धडे घेतले. अशा परिस्थितीतही आमच्यासमोर एक संधी होती. आम्ही एकही संधी गमावली असे नाही तर मला आणखी एक संधी मिळाली आहे, असे त्या म्हणाल्या.
भारताबद्दल काय म्हणाल्या सुनिता विल्यम्स :
अवकाशातून हिमालय आणि भारताच्या इतर भागांचे रंग पाहून आश्चर्य वाटले. दिवसा आणि रात्री दोन्ही वेळी भारत पाहणे हा एक अविश्वसनीय अनुभव होता.