Axiom Mission 4 मोहिमेच्या यशस्वी प्रयोगानंतर शुभांशु शुक्ला 14 जुलैला परतणार
नासाच्या कमर्शियल क्रू प्रोग्रामचे प्रमुख स्टीव्ह स्टिच यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, "अॅक्सिऑम-4 मोहिमेच्या प्रगतीवर आमची सतत नजर आहे. सध्या अनडॉकिंगसाठी 14 जुलै हे निर्धारित लक्ष्य आहे."
या मोहिमेच्या कालावधीत, शुभांशु शुक्ला आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाच्या वातावरणात विविध शास्त्रीय प्रयोग केले. यात 31 देशांचे एकूण 60 प्रयोग पूर्ण झाले असून त्यात भारताचे सात आणि नासाचे पाच प्रयोगही समाविष्ट होते. शुक्ला यांनी या काळात भारतातील लखनौ, बेंगळुरू, तिरुअनंतपुरम आणि गुवाहाटीमधील विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला.
14 दिवसांच्या नियोजित मोहिमेनंतर आता ‘ग्रेस’ नावाची क्रू ड्रॅगन कॅप्सूल प्रशांत महासागरात उतरवण्यात येणार आहे. लँडिंगसाठी हवामानाची भूमिका निर्णायक ठरणार आहे. अॅक्सिऑम, स्पेस एक्स आणि नासा यांच्यातील समन्वयानुसार परतीसाठीच्या हालचाली सुरू झाल्या असून परतीचे निश्चित वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध होणार आहे.
या दोन आठवड्यांच्या अवकाश प्रवासात, चारही अंतराळवीरांनी 230 वेळा सूर्योदय-सूर्यास्त पाहिले असून, 400 किमी उंचीवरून फिरणाऱ्या ISS मधून त्यांनी ताशी सुमारे 28000 किमी वेगाने जवळपास 100 लाख किमीचा प्रवास केला आहे.