Iran Israel conflict : अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणचेही प्रत्युत्तर; सायरनचे ही आवाज आणि...
मध्यपूर्वेतील तणाव अधिक वाढत असताना, अमेरिका आणि इराण यांच्यात थेट लष्करी संघर्ष उफाळून आला आहे. इस्त्रायल-इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आता अमेरिका देखील थेट युद्धात उतरली असल्याच पाहायला मिळत आहे. इराणच्या तीन महत्वाच्या अणुऊर्जा केंद्रांवर अमेरिकेने हवाई हल्ले केले.
अमेरिकेने फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान या अणुऊर्जा केंद्रांना लक्ष्य करत पहाटे जोरदार हवाई हल्ले केले. या हल्ल्यामुळे जागतिक स्तरावर खळबळ उडाली असून, युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर इराणनेही तत्काळ प्रतिक्रिया दिली आहे. इराणच्या नवीन बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ल्यादरम्यान मध्य आणि उत्तर इस्रायलमध्ये सायरन वाजले आहेत. सध्या इराणच्या संरक्षण यंत्रणा हायअलर्टवर असून, देशभरात युद्धजन्य स्थिती निर्माण झाली आहे.
इराणच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, "युद्धाची सुरुवात अमेरिकेने केली आहे, मात्र शेवट आम्ही करू. अमेरिकेला याची किंमत मोजावी लागेल." या कठोर शब्दांत इराणने अमेरिकेला करारा इशारा दिला आहे. संपूर्ण घटनाक्रमामुळे मध्यपूर्वेत तणावाची पातळी अत्यंत धोकादायक टप्प्यावर पोहोचली असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता व्यक्त केली जात आहे. युएन सुरक्षा परिषदेकडूनही या परिस्थितीकडे लक्ष दिलं जात असून, लवकरच आणीबाणीची बैठक होण्याची शक्यता आहे.